नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात १५ वर्षांपूर्वी साधारण २०११ च्या सुमारास ‘कुवानी’ चा जन्म झाला. वयात आल्यानंतर अल्पावधीतच तिने आपले साम्राज्य प्रस्थापित केले. पण त्याचवेळी ‘कुवानी’ने एक उत्कृष्ट आई म्हणूनही नावलौकिक कमावला आहे. मायेच्या छत्रछायेखाली दोन्ही बछडे बिनधास्त मस्ती करत आहेत. तिच्या मातृत्वाची एक सुंदर झलक वन्यजीव छायाचित्रकार जतीन पटेल यांनी टिपली आहे.
‘कुवानी’ लहानपणापासून अतिशय धीट आणि तोच वारसा तिचे बछडे चालवत आहेत. उतारवयाकडे ती झुकली असली तरीही सुरुवातीपासूनच धीट असल्याने ती रस्त्यावर अतिशय आरामात पर्यटक वाहनांची पर्वा न करता चालते.
हिरडीनाला परिसरातील एका वाघिणीला ‘शिवाजी’ नावाच्या अतिशय देखण्या आणि आक्रमक असणाऱ्या वाघापासून तीन बछडे झालेत. त्यातीलच एक ‘कुवानी’ आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या जवळपास प्रत्येकच वन्यजीव छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात ‘कुवानी’ कधी एकटी तर कधी बछड्यांसह टिपली गेली आहे.
‘कुवानी’ वाघीण एक उत्कृष्ट अशी आई आहे. ती अतिशय काळजीपूर्वक आपल्या बछड्यांना वाढवते. आपल्या बछड्याचे ती चांगले संगोपन करते. वाघिणीला आकर्षित करण्यासाठी बरेचदा वाघ तिच्या बछड्यांना मारतात. इतर वाघिणींच्या तुलनेत ‘कुवानी’चे एकदा तीन बछडे मारले गेले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात मुळातच मर्यादित स्वरूपाचे पर्यटन आहे. झरी आणि पांगडी या दोन गेटमधूनच येथे पर्यटकांना प्रवेश दिला जातो. या दोन्ही गेटमधून मोजक्याच जिप्सी गाड्या सोडण्यात येत असल्याने येथे पर्यटकांची फारशी गर्दी कधीच बघायला मिळत नाही. या परिसरात दिसणारे अनेक वाघ या पर्यटन क्षेत्राच्या बाहेरील परिसरात आहेत. त्यामुळे ‘कुवानी’सारख्या वाघिणीने मनमोहक दर्शन देऊन वन्यप्रेमींना कायम खूष केले आहे. पर्यटनाच्या रस्त्यावर ही वाघीण कायम वाहनांची पर्वा न करता बछड्यांसह चालते. आज ‘कुवानी’ वाघीण उतारवयाकडे झुकली आहे. मात्र, आजही तिला दोन बछडे आहेत आणि त्यांचे योग्य असे पालनपोषण ती करीत आहे.
जतीन पटेल यांनी टिपलेल्या व्हिडिओत देखील त्याची झलक दिसून येते. वयाचा कोणताही ताण ‘कुवानी’ च्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. याउलट अतिशय खंबीरपणे ती तिच्या बछड्यांना जंगलाची ओळख पटवून देताना दिसून येते. कधी आईच्या बरोबरीत तर कधी तिच्या आजूबाजूला, मागे चालत हे बछडे या जंगलाची, जंगलातील वाटांची ओळख करुन घेत आहे.

