नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “चंदा” नावाच्या वाघिणीने अखेर सातारा, सांगली, कोल्हापूर व काहीसा रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात प्रवेश केला आहे. “मिशन तारा” मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ताडोबातून निघालेली ही वाघीण तब्बल ८५० किलोमीटरचे अंतर पार करत सह्याद्रीत पोहचली. वाहनातून झेप घेताच तिने मोठी डरकाळी दिली आणि जणू सह्याद्रीत पोहचल्याची वर्दी दिली.
राज्यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या स्थलांतरणाला केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून सप्टेंबर महिन्यात परवानगी मिळाली. ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्रप्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी असे आठ वाघ त्यासाठी जेरबंद करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी त्याठिकाणी स्थलांतरित करण्यात आहे. ते सह्याद्रीत स्थिरावल्यानंतरच पुढील वाघांचा प्रवास सुरू होणार आहे.
व्याघ्रगणनेच्या २०२२च्या अहवालात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात एकाही वाघाची नोंद नव्हती. त्यामुळे राज्याच्या वनखात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सहा वाघांना सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्याची योजना आखली. हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि दीड वर्षांपूर्वी प्राधिकरणाची परवानगी मिळाली. या प्रस्तावात तीनदा त्रुटी निघाल्या. त्या दूर करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला.
वाघाच्या स्थलांतरणासाठी याठिकाणी काम देखील सुरू करण्यात आले. २०२२-२३ मध्ये ५० चितळ सोडण्यात आले. त्यासाठी सुमारे दहा एकरचे कुंपण तयार करण्यात आले आणि याठिकाणी प्रजनन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जेणेकरून संख्या वाढल्यानंतर ते चितळ व्याघ्रप्रकल्पात सोडता येतील. जानेवारी २०१० मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या या व्याघ्रप्रकल्पात वाघ नैसर्गिक स्थलांतर करून येतो, पण तो स्थिरावत नसल्याचा इतिहास आहे.
मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये स्थलांतर करून आलेला वाघ याठिकाणी स्थिरावला आहे. व्याघ्रप्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना अभयारण्यात एक व चांदोली राष्ट्रीय उद्यानात दोन असे तीन वाघ आता याठिकाणी आहेत. २००८ पासून भारतात व्याघ्र स्थलांतर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री सह्याद्रीत पोहचल्यानंतर या वाघिणीला त्याठिकाणी तयार करण्यात आलेल्या “सॉफ्ट इंक्लोजर” मध्ये सोडण्यात आले. ती हा नवा अधिवास स्वीकारणार का हे बघून नंतर तिला व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात येणार आहे.
वाघिणीच्या “प्रेग्नन्सी” चे काय..?
वाघिणीला जेरबंद केल्यानंतर तिच्या “प्रेग्नन्सी” ची तपासणी करण्यात आली नाही. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मते, वाघिणीच्या “प्रेग्नन्सी” ची तपासणी कशी करणार? ती करता येत नाही. पण त्याचवेळी वनखात्यातील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते सोनोग्राफी करून त्या वाघिणीची”प्रेग्नन्सी” टेस्ट करता आली असती. शिवाय तिच्या एकूण शारीरिक बदलावरून हे ओळखता येते. त्यामुळे या वाघिणीची “प्रेग्नन्सी टेस्ट” का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आधी “एअरलिफ्ट”, पण आता “बायरोड”
ताडोबातील या वाघिणीला आधी “एअरलिफ्ट” करून नेण्यात येणार होते, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता “बायरोड” तिला पाठवण्यात आले.
