नागपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या ‘झीनत’ या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. यामुळे सिमिलीपालमधील वाघांच्या आनुवंशिक वैविध्यात वाढ करण्याच्या प्रकल्पाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
सिमिलीपालमधील वाघांच्या संख्येचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि आनुवंशिक वैविध्य वाढवण्यासाठी ओडिशा वनविभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाची सप्टेंबर २०२४ मध्ये परवानगी घेण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ दरम्यान ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणींना सिमिलीपालमध्ये सोडण्यात आले. हे स्थलांतर यशस्वी ठरले, कारण दोन्ही वाघिणी सिमिलीपालच्या नैसर्गिक अधिवासात यशस्वीरित्या रुळल्या.
वाघांच्या विखुरण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार ‘झीनत’ सिमिलीपालच्या सीमा ओलांडून बाहेर पडली. डिसेंबर २०२४ मध्ये तिने झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सुमारे २५० किलोमीटरचा मोठा प्रवास केला. वनकर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे आणि पश्चिम बंगाल वनविभागाच्या सहकार्याने तिला पुन्हा पकडण्यात आले. त्यानंतर १ जानेवारी २०२५ ला तिला आठ हेक्टरच्या मोठ्या बंदिस्त क्षेत्रात ठेवण्यात आले होते. पुढे एप्रिल २०२५ मध्ये तिला पुन्हा जंगलात मुक्त करण्यात आले. त्यानंतर काही काळातच या वाघिणीचे सिमिलीपालमधील एका स्थानिक नर वाघाशी मिलन झाले. मात्र, ती गर्भवती झाली नाही.
दरम्यानच्या काळात, ही वाघीण सिमिलीपालच्या आत मुक्तपणे फिरत राहिली आणि तिने गाभा क्षेत्रात आपला स्वत:चा हद्दीचा प्रदेश निश्चित केला.
‘कॅमेरा ट्रॅप’च्या माध्यमातून लक्ष
सध्या ‘झीनत’वर उपग्रहावर आधारित कॉलर, व्हीएचएफ सिग्नल आणि कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच, या वाघिणीच्या फिरण्याच्या क्षेत्रात आणि लगतच्या परिसरामध्ये सतत गस्त घातली जात आहे. ताडोबातील वाघिणी आणि सिमिलीपालमधील नर वाघ यांच्या संकरातून निर्माण झालेली ही संतती भविष्यात सिमिलीपालमधील वाघांच्या आनुवंशिक वैविध्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा दावा ओडिशा वनविभागाने केला आहे. या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी ही जिद्द, विज्ञान आणि सांघिक कार्याची एक प्रेरणादायी गाथा ठरली आहे.
