नागपूर : ही फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील एका वाघिणीची गोष्ट नाही, तर सतत संघर्ष करत जगण्याची कहाणी आहे. गेल्या दोन वेळा तिच्या बछड्यांचा मृत्यू झाला. प्रत्येकवेळी तिने नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न केला. अधिवास क्षेत्रासाठी संघर्ष, इतर वाघांचा दबाव, सततचे ‘फॉल्स मेटिंग’ आणि जंगलातील असुरक्षित वातावरण… मात्र, ताडोबातील ही ‘वीरा’ पुन्हा एकदा बछड्यांसह दिसली… आणि जंगलाने जणू सुटकेचा नि:श्वास टाकला.

वीरा पुन्हा एकदा बछड्यांसह…

मुल गमावण्याचं सर्वाधिक दु:खं जर कुणाला होत असेल तर ती आईच. नावाप्रमाणेच वीर असलेल्या ‘वीरा’ या वाघिणीने एकदा नाही तर दोनवेळा बछड्यांना गमावले. मात्र, प्रत्येकवेळी ती नव्याने उभे राहिली. कदाचित संघर्ष तिच्या पाचवीला पुजलेला… या सर्वांचा परिणाम तिच्यावर स्पष्ट दिसून येत होता. तिचे वजन कमी झाले होते. तिच्या हालचाली मंदावल्या होत्या आणि तेवढ्याच सावध हालचाली होत्या. सततचा ताण तिच्या डोळ्यांतूनही जाणवत होता. मात्र, यावेळी वनविभागाने तिच्यावर विशेष लक्ष ठेवले. सातत्यपूर्ण निरीक्षण, अतिरिक्त काळजी आणि संवेदनशील व्यवस्थापनामुळे ‘वीरा’ पुन्हा आई झाली आहे. यासाठी वनविभागाचे खरोखर कौतुक करावे लागेल.

एका छायाचित्रकाराचे आवाहन…

इतक्या छोट्या बछड्यांचे जंगलात दर्शन होणे दुर्मीळ असते. त्यामुळे छायाचित्रकार आणि पर्यटकांमध्ये उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. पण ‘वीरा’ची कहाणी फक्त ‘क्लिप’ किंवा ‘फोटो’पुरती मर्यादित नाही. ती एका वाघिणीच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढ्याची कहाणी आहे. तिला आता फक्त शांतता हवी आहे. तिच्या बछड्यांना सुरक्षितपणे वाढवण्यासाठी बेलारा, पळसगाव आणि मदनापूर परिसर काही काळ पूर्णपणे शांत आणि नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. कारण शेवटी… पर्यटन थांबू शकते, फोटोग्राफी थांबू शकते. पण एका आईची जगण्यासाठीची झुंज थांबता कामा नये. वन्यजीव छायाचित्रकार रणवीर गौतम यांनी एकूणच ‘वीरा’च्या मातृत्त्वाचा हा प्रवास अतिशय उत्कृष्टपद्धतीने मांडला आहे. त्याचवेळी तिच्या सुरक्षित मातृत्त्वासाठी इतर छायाचित्रकार व पर्यटकांना आवाहन देखील केले आहे.

हेही वाचा

ती ‘जुनाबाई’चे अपत्य..

चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोनअंतर्गत बेलारा, पळसगाव, गोंडमोहाळी जंगलात ‘वीरा’ ही वाघीण कायम पर्यटकांना भूरळ घालत असते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘जुनाबाई’ आणि ‘कमकाझरी’ यांचे अपत्य म्हणजे ‘वीरा’. गोंडमोहाळी-पळसगाव क्षेत्रात तिचे कायम वास्तव्य राहीले आणि पर्यटकांनाही ती कायम भूरळ घालत आली आहे. मोठी झाल्यानंतर कित्येकदा ती ‘झायलो’ या वाघासोबत दिसली. यानंतर तिने बछड्यांना जन्म दिला आहे, पण अलीकडे तिला मातृत्त्वाची अनुभूती घेताना मात्र अनंत अडचणीतून जावे लागले.