नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या दिशेने मार्गक्रमण करेल अशी अपेक्षा असलेल्या रानटी हत्तीच्या कळपाने अखेर सावली तालुक्यातील गोलाभुज-मुरमाडी परिसरालाच तात्पुरते निवासस्थान बनवल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सावली वनपरिक्षेत्रात मुक्कामी असलेला हा कळप सलग त्याच परिसरात स्थिरावला. दरम्यान, या कळपातील एक मादी हत्ती गर्भवती असल्याने हा कळप त्याठिकाणी स्थिरावला असल्याने वनविभाग आणि स्थानिकांचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे.
मादी हत्ती गर्भवती असल्याने काळजी
हत्ती तज्ज्ञांच्या मते, कळपातील गरोदर मादी हत्ती, अवघ्या महिनाभराचे पिल्लू आणि इतर लहान पिल्लांची संख्या अधिक असल्याने दीर्घ प्रवास सध्या शक्य नाही. त्यामुळे सुरक्षित, शांत आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असलेल्या गोलाभुज-मुरमाडी परिसराची निवड कळपाने केल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या कळपाला स्थिर ठेवणे आणि त्यांना कोणताही त्रास होऊ न देणे याची खबरदारी वनविभाग घेत आहे. कारण, या परिस्थितीत कळपात व्यत्यय आणल्यास हत्ती बिथरून त्याचे उलट परिणाम परिसरातील गावाला बसू शकतात. त्यामुळे वनविभागाने अधिक सुरक्षित भूमिका घेतली आहे.
हत्तीसाठी येथे सुरक्षित वातावरण
राजोली उपक्षेत्रातील हा परिसर वन्यजीवांसाठी अनुकूल अधिवास म्हणून ओळखला जातो. घनदाट जंगल, अत्यल्प मानवी वर्दळ आणि जवळपास असलेले तीन तलाव यामुळे येथे वर्षभर तुलनेने शांत व थंड वातावरण असते. हत्तींच्या कळपाला आवश्यक असलेली सुरक्षितता आणि पाण्याची उपलब्धता येथे सहज मिळत असल्याने त्यांनी सध्या मुक्काम वाढवल्याचे निरीक्षण वन विभागाने नोंदवले आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, कळपात एक सुळे असलेला हत्ती, एक गरोदर मादी हत्ती, अंदाजे एक महिन्याचे पिल्लू तसेच इतर लहान पिल्लांचा समावेश आहे. सावली वनपरिक्षेत्रात दाखल झाल्यापासून या कळपाने सुमारे ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास केला आहे. मात्र पुढील हालचाली करण्याऐवजी त्यांनी सध्या सुरक्षित अधिवासात थांबणे पसंत केले आहे.
आणखी काही दिवस मुक्काम
हत्ती तज्ज्ञांचे मते, लहान पिल्ले आणि गरोदर मादीमुळे कळपाचा वेग कमी होतो. अशा वेळी हत्ती पाण्याची उपलब्धता, शांतता आणि सुरक्षितता असलेल्या भागालाच प्राधान्य देतात. गोलाभुज-मुरमाडी परिसरातील दाट वनराई आणि तलावांमुळे हा कळप येथे आणखी काही दिवस मुक्काम ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनखात्याची चमू देखील या कळपावर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे.
