अमरावती: राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना आता काँग्रेसने ‘आक्रमक’ संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. केवळ पारंपरिक पद्धतीने कार्यकर्त्यांच्या फळीवर अवलंबून न राहता, पक्षाचे विचार, वारसा आणि संविधानावर निष्ठा असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसने राज्यभर ‘प्रतिभा शोध अभियान’ (टॅलेंट हंट) सुरू केले आहे.

बौद्धिक आणि वैचारिक बळकटीकरणावर भर

राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणात केवळ घोषणाबाजीपेक्षा वैचारिक मांडणी करणाऱ्या नव्या फळीतील कार्यकर्त्यांची गरज काँग्रेस पक्षाला भासत आहे. हे ओळखूनच लोकशाही मूल्ये आणि संविधानवादी विचारांशी बांधीलकी असणाऱ्या लोकांसाठी पक्षाने हे विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

अभियानाचे स्वरूप काय?

जिल्ह्या जिल्ह्यात विविध विषयाची उत्तम ज्ञान असलेले अनेक लोक आहेत, त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यात निवड झालेल्यांना संशोधन विश्लेषक, प्रवक्ते तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची संधी देण्यात येईल. तीन टप्प्यात हा कार्यक्रम होणार असून या अभियासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत, त्यानंतर त्या अर्जांची छाननी केली जाईल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पत्रकार, इतिहास तज्ञ यांसह विविध क्षेत्रातील तज्ञ यांची समिती छाननी झालेल्यांची मुलाखत घेतील व त्यातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतिम निवड करणार आहे. या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.

संपूर्ण देशभरात अभियान

राजकारणात येण्याची अनेकांची इच्छा असते पण मार्ग नसतो, समाजातील प्रतिभासंपन्न लोकांच्या प्रतिभेला चालना देण्याचा काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहे. हा एक पारदर्शक कार्यक्रम आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. देशभरात हे अभियान सुरु असून उत्तर प्रदेशातून ५५० जणांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे तर जम्मू काश्मीर मधून १०० लोकांनी नोंदणी केली आहे.

जे निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहून संघटनात्मक कामात रस घेतात आणि जिल्हा किंवा राज्य पातळीवर वेळ देऊ शकतात, त्यांना संघटनेत सामील होण्याची संधी दिली जात आहे. लेखन, काव्यरचना, घोषणा तयार करणे आणि कार्यक्रम व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात कुशल असलेले कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. यासोबतच साहित्यिक आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यातून पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आता महाराष्ट्रात या अभियानाला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे.