यवतमाळ : मार्च महिन्यातील वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने प्रशासकीय कार्यालयांच्या आवारातील वाहने लक्ष्य केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज गुरूवारी दुपारी वाहतूक शाखेने वाहने ‘टोईंग’ केल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयात येताना नागरिकांनी वाहने आणूच नयेत का, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय आवारातील वाहने ‘टोईंग’ करण्याचा धडाका लावल्याने वाहनधारकांना हातातील काम सोडून गाड्या सोडवायला धावावे लागत आहे.

सध्या वाहतूक पोलिस ‘मार्च एंडिंगचे टार्गेट’ पूर्ण करायचे असल्याने शासकीय कामासाठी कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांना विनासायास दंड ठोठावण्यासाठी ही मोहीम राबविली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक शासकीय कार्यालये आहेत. येथे जिल्ह्यातील शकडो नागरिक दररोज आपले काम घेऊन येतात. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणी पार्किंगची पुरेशी सोय नाही. त्यामुळे येथे येणारे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहन पार्किंग करतात. हीच संधी हेरून जिल्हा वाहतूक शाखेचे ‘टोईंग’ वाहन येथील वाहनधाकरकांना ‘टार्गेट’ करतात.

हेही वाचा ::: प्रशासनास फसविणाऱ्या तोतयाविरूद्ध यवतमाळातही गुन्हा दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयात थाटला सर्वोच्च न्यायालयाचा डेस्क

वाहनधारक कार्यालयात गेले असताना त्यांचे वाहन ‘टोईंग’ होत असल्याने ते कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर वाहन जागेवर दिसत नाही. ही कारवाई करताना संबंधित वाहनाच्या क्रमांकाची उद्घोषणा करणे आवश्यक आहे. या काळात वाहनधारक परत आल्यास वाहन ‘टाईंग’ करू नये, असेही नियम आहेत. तीन वेळा उद्घोषणा करूनही वाहनधारक आला नाही तर वाहन ‘टोईंग’ करता येते. वाहन उचलून नेताना ते कोणी, कुठे नेले याची माहिती संबंधित वाहनधारकास कळावी, अशा पद्धतीने माहिती तेथे नमूद करण्याची तसदीही वाहतूक शाखा घेत नाही. शिवाय ‘टोईंग’ वाहनावर एएसआय दर्जाचा अधिकारी असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वाहतूक पोलीस ही कारवाई करत असल्याने वाहनधारकांची आर्थिक लूट होत असल्याचीही तक्रार आहे.

हेही वाचा ::: चंद्रपूर : भटक्या श्वानाने चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला; १९ टाक्यांची अवघड शस्त्रक्रिया

यवतमाळ शहरात वाहतूक व्यवस्था सदोष आहे. ती सुधारण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. शहरात कुठेच पार्किंगची व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी रस्याीनच्या दुतर्फा वाहने लावली जातात. त्यांच्यावर क्वचितच कारवाई होते. चौकाचौकात वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. सिग्नल तोडून सुसाट जातात, त्यांच्यावर वाहतूक पोलीस कारवाई करत नाही. अनेक वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना मोबाईल पाहण्यात, मित्रांसोबत गोष्टी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र रस्यांकावर दिसते. मात्र, आपल्या विभागातील या त्रुटी दूर करण्याऐवजी वाहतूक शाखा शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना वेठीस धरत असल्याने रोष व्यक्त होत आहे.