शिक्षकांनी बदडल्याने भाषण देण्यास शिकलो

शिक्षकदिनी गडकरींकडून शिक्षकांच्या आठवणींना उजाळा

शिक्षकदिनी गडकरींकडून शिक्षकांच्या आठवणींना उजाळा

नागपूर : त्या दिवशी शिक्षकांनी मारले नसते तर मी कधीच भाषण द्यायला शिकलो नसतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी शिक्षक दिनी  शिक्षकांनी दिलेल्या त्या शिक्षेची आठवण काढत त्यांचे आभार मानले. साऊथ पॉईंट शाळेच्या कार्यक्रमात स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

साऊथ पब्लिक शाळेच्या स्थापना दिन व शिक्षक दिनानिमित्त व शाळेचे संस्थापक स्व. दीनानाथ दस्तुरे व स्व. श्रीमती दस्तुरे यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार मोहन मते, शाळेचे संचालक देवेंद्र दस्तुरे व संचालिका मृणालिनी दस्तुरे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर व शिक्षक उपस्थित होते.

शाळेच्या आठवणी सांगताना गडकरी म्हणाले, शाळेत भाषण देताना अडखळणाऱ्या विद्यर्थिनीची खिल्ली उडवत असताना मुख्याध्यापकाने बघितले. त्यानंतर त्यांनी कक्षात बोलवत माझी कानउघाडणी करत मारले. ती किमान अडखळत तरी भाषण देत आहे. तुझ्यात तर तेवढीही हिंमत नाही. शिक्षकाचे तेच शब्द गडकरींना प्रेरणा देणारे ठरले आणि आणि रागापायी का होईना भाषण देण्याची इच्छा जागृत झाल्याचे गडकरी म्हणाले. शिक्षकांनी त्या दिवशी बदडले नसते तर आज उत्तम भाषण देऊ  शकलो नसतो. आज मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत भाषण देऊ  लागलो असून भाषणांच्या व्हिडीओद्वारे यूटय़ुबवरून लाखो रुपये कमावत आहे असेही गडकरी म्हणाले.

भारतीय शिक्षण पद्धती सर्वात मोठी शक्ती असून मूल्याधिष्ठित शिक्षण, अबाधित कुटुंब संस्था आणि कौटुंबिक संस्कार हे त्याचे स्तंभ आहेत. जगात कोणीही परिपूर्ण नाही, प्रत्येकात अवगुण असतातच. मात्र, शिक्षकांच्या सान्निध्यात आपले दोष गुणांमध्ये परिवर्तित करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. चांगले डॉक्टर, चांगले इंजिनिअर बनणे आवश्?यक आहे. मात्र, त्यापूर्वी चांगला माणूस बनणे महत्त्वाचे असून त्यासाठी देशात चांगल्या शिक्षण संस्था असणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.

करोनामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गडकरी यांनी अनेक किस्से सांगितले. सचिन तेंडुलकर कमी उंचीचा असून ही परदेशातील उंचपुऱ्या गोलंदाजांना नामोहरम करायचा. यासाठी त्याने शारीरिक शक्ती नव्हे तर कौशल्याचा वापर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून विविध क्षेत्रातले कौशल्य आत्मसात करावे. कोणतीही संस्था ही मोठी इमारत असल्यामुळे यशस्वी होत नाही, तर तेथील संचालक व शिक्षकांच्या गुणवत्तेवर संस्थेचे मूल्यमापन होते. उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षणाचा संस्कार झाला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Teacher day 2021nitin gadkari praise teacher zws

ताज्या बातम्या