अकोला : गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घडली आहे.शिक्षकाची आपल्याच विद्यार्थिनीवर वाईट नजर पडली. त्यातून नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे दुष्कृत्य केले. ग्रामस्थांना हे लक्षात येताच त्यांनी नराधम गुरुजीला शाळेतच चांगलेच बदडून काढले. त्याची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढली झाली आहे. महिला, युवती व शालेय मुली देखील सुरक्षित नसल्याचे चित्र समाजात निर्माण झाले. दररोज कुठेना कुठे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात. अकोला जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनामुळे समाजमन ढवळून निघाले. जिल्हा परिषद शाळेत चक्क शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे गुरु-शिष्यामधील पवित्र नात्याला काळिमा फासल्या गेली. एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळा गाठली. शिक्षकाला चांगलाच चोप दिला.
पातूर तालुक्यात येणाऱ्या एका गावातील जिल्हा परिषद शाळेत हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यांनी शिक्षकाला शाळेत पकडून दुष्कृत्य केल्यामुळे जबर ‘प्रसाद’ दिला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून नराधम शिक्षकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. या सर्व प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
गुरुजी तुम्ही सुद्धा, कुणावर विश्वास ठेऊन विद्यार्थिनींना पाठवावे?
महिलांच्या सुरक्षेचा सध्या गंभीर प्रश्न आहे. उज्ज्वल भविष्यासाठी पालक आपल्या पाल्यांना चांगल्यात चांगल्या शाळेत पाठवतात. गुरुजन त्यांना ज्ञानाचे धडे देऊन एक सुजाण, सुसंस्कृत व सुशिक्षित नागरिक बनवतील, अशी पालकांना अपेक्षा असते. मात्र, आता ज्ञानाचे मंदिर शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर आल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. या प्रकारच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात संशयाचे वातावरण निर्माण झाले. गुरुजीच असे गैरकृत्य करीत असतील तर कुणावर विश्वास ठेऊन विद्यार्थिनींना शाळेत पाठवावे, असा प्रश्न पालकांपुढे उपस्थित झाला आहे.
