नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने भाजपशी सल्लामसलत न करता जाहीर केल्याने भाजपची कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे, शिक्षक भारतीनेही राजेंद्र झाडे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी अद्याप काँग्रेसच्या पाठिंब्याची त्यांना प्रतीक्षा आहे. भाजपकडून शिक्षक आघाडीच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे आणि अनिल शिवणकर उमेदवारीसाठी वरिष्ठांच्या भेटी घेत आहेत. काँग्रेसकडूनही मृत्यूंजय सिंग उमेदवारीसाठी रांगेत आहेत. मात्र, निवडणूक तोंडावर आली असतानाही भाजप व काँग्रेसने आपापली भूमिका स्पष्ट केली नसल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचे लक्ष आता भाजपच्या ताब्यातील शिक्षक मतदारसंघावर आहे. मात्र, ही जागा जिंकण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसमधून अद्याप कुठल्याही नावाची चर्चा नाही. मागील निवडणुकीमध्येही काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार देऊन शिक्षक भारतीच्या मतांची विभागणी केली होती. याचा फायदा गाणार यांना झाला होता. आताही शिक्षक भारतीने पुन्हा एकदा राजेंद्र झाडे यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केली आहे, तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सरकार्यवाह सुधाकर अडबाले रिंगणात आहेत. त्यांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्त, या दोन्ही पक्षांची भूमिका गुलदस्त्यात असल्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे.