नागपूर: राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती. उल्हास नरडसह इतरांना जामीन मंजूर झाला आहे. तर निवृत्त उपसंचालक अनिल पारधी यांनाही जामीन मंजूर करण्यात आला. या घोटाळ्यात बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याच्या आरोपाखाली वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांचे केवळ निलंबन करण्यात आले. परंतु, चौकशी अहवालात वाघमारे आरोपी आढळूनही त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली नाही.
यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देणे, मान्य ठरावामध्ये फेरबदल करून खोटे नियुक्तीपत्र दिणे, खोटे रुजू अहवाल आणि खोट्या व बनावट नियुक्त्या, पदोन्नती दाखवून शासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली नागपूर विभागीय माजी उपसंचालक वैशाली जामदार यांना चौकशीचे नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही. अखेर शुक्रवारी जामदार यांना अटक करण्यात आली आहे. पहिल्यांदाच एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वैशाली जामदार या उल्हास नरड यांच्याआधी नागपूरच्या विभागीय उपसंचालक होत्या. त्यांच्या काळातही शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
सध्या राज्यभर गाजत असलेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती.
प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी जामदार यांना अटक झाल्याने या घोटाळ्यात अजून कुणाला अटक अशी भीती अधिकाऱ्यांच्या मनात आहे.