वर्धा : राज्यातील शिक्षकांसाठी राज्य शासन विविध सुविधा काही योजना राबवित देते. वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना ही तशीच एक सुविधा म्हटल्या जाते. म्हणजे शिक्षक किंवा त्याच्या कुटुंबातील कोणी आजारी झाल्यावर त्याच्या उपचाराचा खर्च शासन देत असते. त्यासाठी जी देयके सादर केली जातात त्यास वैद्यकीय प्रतिपूर्ती म्हणतात. आता याचा लाभ मिळण्यासाठी एक अट शासनाने लागू केली आहे. २२ मे रोजी तसा आदेश काढण्यात आला आहे.
आभा कार्ड
राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ‘आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट’ म्हणजेच (ABHA) आभा कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. यापुढे आभा कार्ड नसलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक (Medical Reimbursement Bill) स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
असे आहे परिपत्रक
या संदर्भात शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन) डॉ. एकनाथ आंबोकर यांनी २२ मे २०२६ रोजी परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, मुंबईचे शिक्षण निरीक्षक आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
निर्णय का घेण्यात आला याचे कारण देण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी मागणी करण्यात आली होती. हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर केला असता, विस्तारित ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण लाभ अनुज्ञेय असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आभा कार्डचे महत्व
या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आधीपासूनच समावेश आहे. त्यामुळे या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे ‘आभा’ कार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे. ‘आभा’ कार्ड आणि त्याचे महत्त्व असे आहे. ‘आभा’ कार्ड हे नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणारे एक १४ अंकी ओळखपत्र आहे. हे कार्ड पूर्णपणे मोफत काढता येते. भविष्यात आरोग्य सेवांचा कॅशलेस आणि डिजिटल लाभ घेण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कार्ड कसे काढावे?
हे कार्ड ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने काढता येते. शिक्षण विभागाने हे कार्ड काढण्याची सोपी कार्यपद्धती आणि एक डिजिटल व्हिडिओ लिंक (YouTube) देखील परिपत्रकासोबत जोडली आहे.ऑनलाइन पद्धत: कर्मचाऱ्यांनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Create ABHA Number’ हा पर्याय निवडावा. आ
धार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून, लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी (OTP) टाकून नोंदणी पूर्ण करावी. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १४ अंकी कार्ड पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड करता येईल. ऑफलाइन पद्धत: इंटरनेटची सोय नसलेल्या कर्मचाऱ्यांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन आधार कार्ड दाखवून हे कार्ड काढून घ्यावे. सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावरून सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही माहिती त्वरित अवगत करून देण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.
सतीश जगताप
विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सतीश जगताप यांनी एक शंका या संदर्भात व्यक्त केली आहे. ते म्हणतात की बऱ्याच खाजगी हॉस्पीटल मध्ये आयुष्यमान भारत कार्ड (आभा कार्ड ) संलग्नित नाही . त्यामुळे हि सुविधा मिळणार नाही . अशावेळेस राज्य शासनाने वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक स्विकारणे व मंजूर करणे आवश्यक राहिल .
