वर्धा : जनगणना २७ चे कार्य जोमात सुरू आहे. तीव्र उष्मा आणि त्यामुळे घाम गाळाव्या लागणाऱ्या शिक्षकांचा जीव मेटाकुटीस आल्याचे चित्र आहे. पण हेच कर्तव्य पार पाडत असतांना शिक्षक मृत्यूमुखी पडल्याची उदाहरणे पुढे आली आणि संघटना सतर्क झाली.
चार शिक्षकांचा मृत्यू
राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘भारतीय जनगणना २०२७’ ( Cencus 27 )च्या कामादरम्यान उष्णतेचा तडाखा आणि कामाच्या प्रचंड ताणामुळे चार शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घडामोड पुढे आली. या गंभीर घटनेची दखल घेत ‘अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे’ च्या वतीने राज्य शासनाकडे आक्रमक मागणी करण्यात आली आहे. मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि त्यांच्या वारसांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी महामंडळाने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे केली.
उष्णतेची लाट, मानसिक ताण
महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, अध्यक्ष के. एस. ढोमसे आणि सचिव अशोक मोरे यांनी राज्य शासनाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जनगणना कार्यात पर्यवेक्षक (Supervisors) आणि प्रगणक (Enumerators) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक हे काम अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
परंतु, सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रचंड उष्णता आणि उन्हाची तीव्र लाट सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत मैदानी पातळीवर जाऊन जनगणनेचे काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचा मोठा ताण येत आहे.
शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना
या कर्तव्यावर असतानाच राज्यातील चार शिक्षकांचा अचानक मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांमुळे संबंधित शिक्षकांचे कुटुंबीय पूर्णपणे उघड्यावर आले असून, सध्या जनगणना कार्यात नियुक्त असलेल्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जर राष्ट्रीय कर्तव्य बजावताना शिक्षकांचा जीव जात असेल, तर त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, असा सूर आता शिक्षक वर्गातून उमटत आहे.
मुख्याध्यापक महामंडळाच्या मागण्या
जनगणना ड्युटीदरम्यान मृत्यू पावलेल्या चारही शिक्षकांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने १ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करावे. मृत शिक्षकांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोणत्याही विलंबाशिवाय तातडीने अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.
या निवेदनावर महामंडळाचे कार्याध्यक्ष मा. मोहनराव सोनवणे, उपाध्यक्ष मा. नंदकुमार बारवकर, मा. प्रकाश देशमुख, मा. शत्रुघ्न बिरकड यांच्यासह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.
मुख्यमंत्री कार्यालय म्हणते…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाने याची तत्पर दखल घेतली आहे. या मुख्यमंत्री सचिवालयाने निवेदनास उत्तर देतांना नमूद केले आहे की संघटनेचा प्रस्ताव प्राप्त झाला. आता योग्य त्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. म्हणून या संदर्भात पुढील माहिती त्या कार्यालयाकडून घ्यावी, असे उत्तर CM Secretariat कडून मुख्याध्यापक संघटनेचे संजय शिप्परकर यांना मेलवर देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना अवगत करण्यात आले होते.
