शहरातील स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर कंपनीकडून कोट्यवधीची खंडणी उकळण्यासाठीच ‘ब्लॅक कॅट’ नावाने ‘हॅकर्स’ने ‘सायबर’ हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ‘हॅकर्स’ने हा जवळपास २ ‘टीबी’पेक्षा जास्त संवेदनशील माहिती चोरी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपुरात केंद्रीय सुरक्षा एजन्सची जवळपास दोन डझन पथके नागपुरात ठाण मांडून बसले असून त्यांनी स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलर कंपनीवर २१ जानेवारीला ‘ब्लॅक कॅट हॅकर्स’ने सायबर हल्ला केला. ‘हॅकर्स’ने कंपनीची महत्त्वाची माहिती चोरली. त्यात कंपनीच्या माहितीसह संरक्षण विषयक माहिती आणि ड्रॉईंग्जचा समावेश होता. कंपनीला तीन ‘ई-मेल’ आले. त्यात काही ‘लिंक’ होत्या.
चोरी केलेला ‘डाटा’ परत हवा असेल तर दिलेल्या ‘लिंक’वर ‘क्लिक’ करा. त्यानंतर कोणत्या स्वरूपात तडजोड करू याबाबत सांगण्यात येणार असल्याचा दावा ‘हॅकर्स’ने केला होता. मात्र, आरोपींची नवीन काहीतरी चाल असल्याचा संशय होता. त्यामुळे याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना दिली व तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल याचा तपास सुरू केला आहे.
प्रकरण ‘सीबीआय’कडे वर्ग होणार
सोलर ग्रुपतर्फे औद्योगिक स्फोटकांसह भारतीय सैन्यासाठीही अनेक स्फोटके व निगडित बाबींचे उत्पादन करण्यात येते. याशिवाय ‘मल्टीमोड ग्रेनेड्स’देखील बनवण्यात येतात. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या हायप्रोफाईल तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली. हे प्रकरण ‘सीबीआय’कडे वर्ग होण्याची शक्यता आहे.