scorecardresearch

‘तेजस्विनी’कडे महिलांचीच पाठ; अधिक दर, अपुऱ्या फेऱ्यांमुळे अल्प प्रतिसाद

महिला सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने २०१९ पासून केवळ महिलांसाठी सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बससेवेकडे महिलांनीच पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

नागपूर : महिला सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने २०१९ पासून केवळ महिलांसाठी सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बससेवेकडे महिलांनीच पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अधिकचे दर, रहदारीच्या मार्गावर अपुऱ्या फेऱ्या आदी बाबी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. एकीकडे, ‘आपली बस’मध्ये जागा मिळत नाही तर दुसरीकडे ‘तेजस्विनी’ मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावताना दिसत आहे. महिला सक्षमीकरण व महिला सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ‘तेजस्विनी बस’चा समावेश केला.

ऑगस्ट २०१९ पासून ही बस सुरू झाली. महिलांसाठी स्वतंत्र बस ही संकल्पना नागपूरकरांसाठी वेगळी होती. दुसरीकडे आपली बसमधून महिलांना दाटीवाटीतून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे तेजस्विनीला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिला मिळणारा प्रतिसाद अल्प स्वरूपाचा आहे. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचाही फटका या सेवेला बसला. ज्या मार्गावर महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे, असे मार्ग व वेळ या सेवेसाठी निर्धारित करणे अपेक्षित होते. ते करण्यात आले नाही. सिव्हिल लाईन्समधील वेगवेगळय़ा शासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांच्या कार्यालयीन वेळेला सोयीच्या ठरेल, अशी वेळ निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे अजूनही बहुतांश महिला कर्मचारी आपली बसमधूनच प्रवास करतात. यासंदर्भात काही महिलांशी चर्चा केली असता त्यांनीही कामाच्या वेळेत फेऱ्या नसणे, योग्य मार्गावरून बस न धावने, या याबाबींकडे लक्ष वेधले. सामान्य बसपेक्षा ‘तेजस्विनी’चे दरही अधिक असल्याचे महिलांनी सांगितले. चौकट ७२ हजार महिलांकडून सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोगनागपुरातील सुमारे ७२ हजार महिला दररोज सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करतात. ही संख्या लक्षात घेऊनच ‘तेजस्विनी बस’ सुरू करण्यात आली होती. मात्र, योग्यप्रकारे नियोजन नसल्याने अनेक महिला आपल्या बसने प्रवास करताना दिसतात.

अशी आहे ‘तेजस्विनी’ची सेवा

महिलांसाठीच्या ‘तेजस्विनी’च्या पाच बसेस शहरात धावतात. यातून दररोज सुमारे तीन हजार महिला प्रवास करतील, असा अंदाज होता. ‘मी जिजाऊ’ योजनेंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली. ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिकवर धावते. त्यासाठी सहा चार्जिग सेंटर सुरू करण्यात आले. प्रतिबस १.४९४ कोटी एवढी किंमत असून प्रति किमी ४२.३० रुपये एवढे दर निश्चित करण्यात आले आहे.

फक्त महिलांसाठी सेवा

‘तेजस्विनी’साठी शासनाने अनुदान दिले असून ही बस महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे इतरांसाठी खुली करता येणार नाही. परिणामी गर्दी कमी दिसून येते. नियोजन कुठेही चुकलेले नाही. बसची व्यवस्था उत्तम असून महिलांनी लाभ घ्यावा.

– रवींद्र भेलावे, परिवहन व्यवस्थापक

गरजेच्या मार्गावर उपलब्ध नाही

हिंगणा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी शीतल म्हणाली, मी देव नगर येथे राहते. हिंगण्याला जायचे असेल तर या मार्गावर ‘तेजस्विनी बस’ नाही. मग ही सेवा घ्यायची असेल तर आधी हिंगणा टी पॉइंट येथे जावे लागते. तसेच ती वेळेत मिळेल, असेही नाही. त्यामुळे आपली बस मधून प्रवास करते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tejaswini backing women higher rates less response insufficient rounds ysh