नागपूर : मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या तापमानाचा फटका विदर्भातील संत्री पिकांना बसला असून अनेक बागांतील झाडांवरील अंबिया बहराची फुले व कोवळी फळे गळत आहेत. यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. विदर्भातील एकूण १ लाख २६ हजार हेक्टरवरील लागवड क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रातील संत्री बागांना याचा फटका बसला असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

यंदा उन्हाळय़ाच्या सुरुवातीपासून म्हणजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच विदर्भातील तापमान ४० ते ४३ अंशावर गेले. संत्री, मोसंबीच्या झाडांना आलेला अंबिया बहार, झाडांना लागलेली कोवळी फळे अचानक वाढलेले तापमान सहन करू शकले नाही, ती करपू लागली. काही भागांत ही कोवळी फळे मोठय़ा प्रमाणात गळून पडली. उन्हाचा तडाखा असाच सुरू राहिला तर अंबिया बहाराला याचा फटका बसू शकतो, असे संत्री उत्पादक रमेश जिचकार यांनी सांगितले. उत्पादकांसाठी अंबिया बहार महत्त्वाचा असतो, एकूण उत्पादनांपैकी ६० ते ७० टक्के उत्पादन याच हंगामातून मिळते.

असे का होते?

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ३८ अंश से.च्या वर तापमान गेले तर अंबिया बहार गळायला सुरुवात होते. फुले आणि नुकतीच धरलेली कोवळी फळेही गळू लागतात. ती गळू नये म्हणून बागांना पाणी द्यावे लागते, मात्र तापमान वाढीचे सातत्य कायम राहिले तर जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ तयार होते आणि ती पाने, फुलांवर जमा होते. यातून बुरशीजन्य रोगाचाही जन्म होतो व यामुळे फळे गळणे, पाने करपणे, झाडे निस्तेज होणे, ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव वाढणे, असे प्रकार घडतात, असे कृषी तज्ज्ञांनी सागितले.

पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

अंबिया बहारासाठी मार्च, एप्रिल हे दोन महिने महत्त्वाचे मानले जातात. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करायला हवा, मात्र अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच (दांडाने) पाणी देतात. विशेष म्हणजे, पाणी देण्याच्या कालावधीत १० ते १२ दिवसांचे अंतर राहते. या काळात तापमान वाढले तर झाडांना आलेली फुले आणि तुरीच्या दाण्याच्या आकाराची फळे सहन करू शकत नाही व ती गळतात. त्यामुळे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते, असे सीसीआरआयचे वरिष्ठ संशोधक डॉ. अंबादास हुच्चे यांनी सांगितले.