लोकसत्ता टीम
वर्धा: महामार्गावरील वाहने अडवून दरोडे टाकणाऱ्या दहा आरोपींच्या टोळीस थेट छत्तीसगडपर्यंत पाठलाग करीत बेड्या ठोकण्यात आल्या.दरोडेखोरांनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांबाबत मिळालेली माहिती धक्कादायक आहे.या प्रकरणात सर्वप्रथम अमरावती येथील मोहम्मद अजीम यांनी तक्रार केली होती. ते भंडारा येथून रेतीचा ट्रक घेवून ७ सप्टेंबरला रात्री अमरावतीसाठी निघाले होते. वाटेत पुलगाव येथे त्यांना रोडवर प्रकाश दिसून आला. ट्रक थांबताच अनोळखी काही व्यक्ती हातात काठ्या घेवून धमकावू लागले. बाजुच्या शेतात मोहम्मद अजीम व त्यांच्या सहकाऱ्यास मारहाण केली. पैसे हिसकावले व ट्रकची डिझेल टँक तोडून १०० लिटर डिझेल कॅनमध्ये भरून त्यांनी पळ काढला. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष चमू गठीत केल्या. पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळावर पाहणी केल्यावर डिझेलने भरलेल्या व काही रिकाम्या कॅन दिसून आल्या. या कॅन उस्मानाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान अमरावती महामार्गावरील तळेगाव दशासरदरम्यान असेच गुन्हे घडल्याची माहिती मिळाली.
अशी झाली गुन्ह्याची उकल
त्यातील एका प्रकरणात बार्शी टाकळी येथील ओम राऊत यांनी तक्रार केली होती. राऊत हे पिकअप वाहनाने माल घेऊन नागपूरकडे निघाले असताना अडवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. कारंजा लाड मार्गावर ते असताना रस्त्यावर एक मोटारसायकल तसेच दोन व्यक्ती पडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे राऊत हा अपघात पाहून थांबले. तेव्हा अचानक काहींनी त्यांना मारहाण करीत पैसे लंपास केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यात सराईत आरोपी असल्याचा संशय व्यक्त झाला. विविध मार्गे तसेच तांत्रिक तपास केल्यावर गुन्हेगारांचे वास्तव्य उस्मानाबाद येथे असल्याचे दिसून आले. तपास केल्यावर हे आरोपी गोंदियात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली. हे पथक महामार्गावर तपास करीत असताना आरोपी महाराष्ट्राची सीमा ओलांडून छत्तीसगडमध्ये पोहचल्याचे स्पष्ट झाले. पोलीस चमूने सलग पाठलाग सुरू केला. राजनांदगाव येथे संशयित व्यक्ती दोन ट्रकमध्ये आढळले. दोन्ही वाहनात नऊ व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पोलीस पथकांनी सापळा रचून अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस असल्याचे लक्षात येताच ट्रकमधील आरोपींनी उड्या मारून पळणे सुरू केले.
हेही वाचा >>>नागपूर हिट ॲन्ड रन प्रकरण : बावनकुळे यांच्या पुत्राच्या वाहनाची आरटीओकडून तपासणी
थरारक पाठलाग
पोलीसांनी पाठलाग करीत प्रथम चार आरोपींना पकडले, तर उर्वरीत पाच आरोपींचा दोन किलाेमिटरपर्यंत पाठलाग केला. रात्रीच्या अंधारात धाडस दाखवून पोलीसांनी अखेर त्यांना पकडलेच. मात्र त्यापैकी दोघांनी नाल्यात उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळे पोलिसांच्या तावडीत सापडलेच. अखेर त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. आरोपींमध्ये भैय्या आबा काळे, बबलू मोहन शिंदे, मधुकर आबा काळे, सचिन बबलू काळे, किरण महादेव काळे, गोविंद तात्या पवार, अनिल शिवाजी काळे तसेच दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावातील आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.