Teosa Vidhan Sabha Election 2024 : तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील शहर आहे. तिवसा तालुक्याला संतांचा आणि पौराणिक ठिकाणांचा इतिहास लाभला आहे. तालुक्यातील वारखेड हे संत अडकोजी महाराजांचे जन्मस्थान आहे. अडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू आहेत. मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्यस्थळ देखील तिवसा तालुक्यात आहे. तुकडोजी महाराजांच्या अनुयायांचे ते श्रद्धास्थान आहे. तालुक्यातील कौडण्यपूर गाव हे पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कौडण्यपूर हे पौराणिक विदर्भ राज्याची प्राचीन राजधानी कुंदिनापुरीचे ठिकाण मानले जाते. धार्मिक तसेच संत परंपरा लाभलेल्या तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस नेत्या यशोमती चंद्रकांत ठाकूर करतात.
तीनवेळा तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
यशोमती ठाकूर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. यशोमती ठाकूर यांनी तीनवेळा तिवसा मतदारसंघातून निवडून येत विधानसभा गाठली आहे. त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ठाकूर यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला व बालविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना काँग्रेस कार्यकारी समितीत देखील स्थान मिळाले होते.
कुटुंबातील सदस्यच विरोधक म्हणून उभा राहिला
२००९ पासून यशोमती ठाकूर या तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव हाती आल्यावर निराश न होता यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात संघटनात्मक बांधणी केली. याचा लाभ त्यांना पुढील तीन निवडणुकींमध्ये झाला. २०१४ च्या निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील सदस्यच विरोधक म्हणून उभा राहिला. ठाकूर यांच्या सख्ख्या बहिणीने त्यांना निवडणुकीत आव्हान दिले, मात्र मतदारांनी यशमोती ठाकूर यांना मतदारसंघाची जबाबदारी सोपवली.
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी विजयश्री खेचून आणली. त्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळाली होती. शिवसेनेचे राजेश वानखडे यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध उभे होते. निवडणुकीत वानखडे यांना १० हजार ३६१ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटही तयारीला लागला आहे. राजेश वानखडे हे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्यासह भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, रविराज देशमुख हेही प्रबळ उमेदवार आहेत.
यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यातील विरोधाची धार तीक्ष्ण
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांना अमरावती मतदारसंघातून विजय मिळाला. त्यांना यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघातून १० हजार ५७६ इतके मताधिक्य मिळाले होते. यातून तिवसा मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव कायम असल्याचे अधोरेखित झाले. प्रचारात यशोमती ठाकूर या आघाडीवर होत्या. या विजयाने कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास दुणावला आहे. यशोमती ठाकूर यांच्यावरील विश्वास वाढला आहे. मात्र विरोधक वाढले आहेत. यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यातील विरोधाची धार तीक्ष्ण झाली असून त्यांच्यात खटके उडतच असतात. आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश वानखडे पुन्हा यशोमती ठाकूर यांच्या विजयमार्गाला आडवे येण्याची शक्यता आहे.
तिवसा मतदारसंघ हा बहुजातीय व बहुभाषिक
तिवसा मतदारसंघ हा बहुजातीय व बहुभाषिक आहे. मतदारसंघात माळी, मुस्लीम, मराठा कुणबी मतदारांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर धनगर आणि तेली समाजाची मतेही भरपूर आहेत. मतदारसंघात २०.८८ टक्के अनुसूचित जातीचे मतदार, ५.१७ टक्के अनुसूचित जमातीचे तर १०.२ टक्के मुस्लीम मतदार आहे.
आक्रमक नेत्या म्हणून ओळख
यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्यातील आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटन, मतदारसंघातील विकासकामे यावरून त्यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. यशोमती ठाकूर या स्वत: वादाच्या भोवऱ्यातदेखील सापडल्या होत्या. एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई केलेल्या वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अमरावती न्यायालयाने यशमोती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना ३ महिने सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली होती.