उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

नागपूर : लहान मुलाची साक्ष पूर्णपणे नाकारता येत नाही. लहान मुलांच्या साक्षीवर विश्वास ठेवण्यासाठी त्याची योग्यप्रकारे छाननी होणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या जबाबाची गुणवत्ता तपासून उलटतपासणीत तो आपल्या जबाबावर कायम असायला हवा. लहान मुलाला न्यायालयात उभे करताना तपास अधिकारी किंवा नातेवाईकांनी त्याला शिकवून पाठवले नाही, अशी खात्री पटल्यावर त्याची साक्ष ग्राह्य धरण्यात यावी, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.

११ वर्षांच्या मुलाने आपल्या आईच्या खुनात वडिलांविरुद्ध दिलेल्या साक्षीमुळे वडिलाला सुनावण्यात आलेली शिक्षा योग्य असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. अंकुश धर्मा चव्हाण (३७) रा. पिंपळगाव, पुसद याने दाखल केलेले अपील फेटाळताना न्या. विनय देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांनी हा निर्वाळा दिला. लक्ष्मीबाई अंकुश चव्हाण हिचा १५ वर्षांपूर्वी आरोपीशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. ती मुले व पतीसह राहात होती. १२ नोव्हेंबर २०१४ ला लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. एफआयआरमध्ये  तिच्या नातेवाईकाने तिने आत्महत्या केल्याची तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी पंचनामा केला असता लक्ष्मीबाई व अंकुशचा मुलगा लहू हा घरी होता व त्याने पोलिसांसमोर आपल्या वडिलांनी आईला केरोसीन टाकून जाळल्याचे सांगितले. त्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या शिक्षेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. आरोपीच्या वकिलांनी लहान मुलाच्या साक्षीवर विश्वास ठेवता येत नाही. त्याला सरकारी पक्ष आणि लक्ष्मीबाईच्या जवळच्या नातेवाईकांनी खोटी साक्ष देण्यासाठी शिकवले असण्याची शक्यता आहे. तसेच एफआयआरमध्ये तिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकाने म्हटले आहे. त्यामुळे शिक्षा रद्द करण्याची विनंती केली.

या प्रकरणी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय म्हणाले, लहान मुलाची साक्ष पूर्णपणे नाकारता येत नाही. लहान मुलांची साक्ष कायद्याच्या पातळीवर तपासली जावी व छाननीनंतरच साक्ष विचारात घेतली जावी. या प्रकरणात घटनास्थळी मुलगा लहू याने घटनास्थळावरच पोलिसांना आपल्या आईला वडिलांनी जाळल्याचे सांगितले. त्यावेळी घटनास्थळावर आई, वडील व मुलगा यांच्याशिवाय कुणीही नव्हते. त्यामुळे घटनास्थळावर त्याला शिकवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.