वर्धा : उद्या रविवारी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द झाली आणि टिकेचे मोहोळ उठले. मुलांची नीट आणि त्यांच्या आईवडिलांची TET परीक्षा पेपर फूट झाल्याने रद्द करावी लागल्याची ही बाब राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रास कलंक म्हटल्या जात असल्याची टीका social Media वर पाऊस पाडत आहे. कारण सेवेत असणारे ज्येष्ठ शिक्षक यांना पण ही परीक्षा द्यावी लागत आहे. त्यातच फेर परीक्षेची तारीख उमटली आणि गोंधळात भर पडली.
असे आहे संभ्रम
२०२६ (TET) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आज, म्हणजेच २८ जून २०२६ रोजी ही होणार होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार (जा.क्र./मरापप/शिव.सहा/२०२६/२२२), २७ जून २०२६ रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी परीक्षेसाठी केंद्रांच्या शहरांमध्ये प्रवासाची तयारी केली होती, त्यामुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या प्रकटनात स्पष्ट केले आहे की, शिक्षक पात्रता परीक्षेची पुढील म्हणजेच अद्ययावत तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परीक्षेचा नवीन दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त महेश चोथे यांनी उमेदवारांना आवाहन केले आहे की, “कोणीही सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.”
फेर परीक्षेचे फेक पत्र
परीक्षा रद्द झाली आणि ४ तासातच फेर परीक्षा ६ जुलै रोजी घेणार असल्याचे पत्र व्हायरल होणे सूरू झाले. विशेष म्हणजे एका शिक्षक नेत्यानेच असे पत्र सदर प्रतिनिधिस पाठविले. त्याची विचारपूस केली तेव्हा हे फेक असल्याचे सोदाहरण दाखवून देण्यात आले. एक तर पत्रावर सही असणाऱ्या अधिकाऱ्याची रद्द झाल्याची व फेर परीक्षा घेण्यात येणार असल्याच्या पत्रावरील स्वाक्षरी भिन्न आहे. दुसरी बाब म्हणजे सदर दोन्ही पत्रावरील जावक क्रमांक मोठी तफावत असणारा आहे. एकाच दिवशी एकाच कार्यालयातून एव्हडी जावक होते कां, अशी शंका व्यक्त झाली आणि फेक प्रकार उजेडात आला. ही बाब लोकसत्ता ऑनलाईन द्वारा स्पष्ट झाली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपला लेखी खुलासा प्रकट केला.
