मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रिक्षावाला म्हणून हिणवले जाते. रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचे शल्य उद्धव ठाकरेंच्या मनात आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी केली. सोन्याचा चमचा घेऊन आले, तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – काँग्रेस नेत्यांविरुद्धची भाजप आमदाराची याचिका फेटाळली 

वाशीम येथे शिंदे गटाच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी अकोल्यात माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवावस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांना सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे दोन महिन्यात या सरकारने केले आहेत. मुख्यमंत्री एकाजागी बसून आदेश देत नाहीत, दीड महिन्यात साडेसातशे निर्णय सरकारने घेतले.’’

हेही वाचा – नागपूर : आदित्य ठाकरे २७ ला संघभूमीत

सर्वसामान्य शिवसैनिकांनीच पक्ष उभा केला. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली. पक्षवाढीसाठी रिक्षावले, पानटपरीवालेच लागतात. कष्ट करावे लागतात, ‘मर्सिडीज’मधून शिवसेना वाढू शकत नाही, असा टोला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना लगावला. मुंबईच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र कधी दिसला नाही, ते आज महाराष्ट्रभर फिरताहेत, अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली. ५० आमदार आणि १२ खासदारांनी आपली साथ का सोडली, याचे आत्मपरीक्षण करण्याची उद्धव ठाकरेंना गरज आहे. आगामी काळात आणखी काही जण आमच्या सोबत येतील, असे ते म्हणाले.