नवनीतसिंग तुलीच्या पंपावर पेट्रोल चोरी

ठाणे पोलिसांच्या कारवाईत इलेक्ट्रानिक चीप आढळले

( संग्रहीत छायाचित्र )

ठाणे पोलिसांच्या कारवाईत इलेक्ट्रानिक चीप आढळलेसहा महिन्यांपासून ग्राहकांची लूट

आधुनिक तंत्रज्ञानाचा (इलेक्ट्रनिक मायक्रो चीप) वापर करून पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रकरणे समोर येत असताना नागपुरातही अशाच प्रकारे ग्राहकांची लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानकापूर येथील नवनीतसिंग तुली यांच्या रबज्योत ऑटोमोबाईल या पेट्रोल पंपावर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पंपाची तपासणी केली असता तेथे दोन ‘डिस्प्ले युनिट’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक चीप’ लावल्याचे आढळून आले.

काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी पेट्रोल पंपावर चीप बसवून देणाऱ्या विवेक शेट्टी याला अटक केली होती. तो पेट्रोल पंपावर इलेक्ट्रनिक चीप लावून देत होता. चौकशीत त्याने देशात अनेक शहरातील पंपावर चीप लावून दिल्याचे पुढे आले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूरच्या रबज्योत पंपावर सोमवारी सायंकाळी तपासणी केली असता तेथील चार पकी २ ‘डिस्प्ले युनिट’मध्ये ‘मायक्रोचीप’ आढळून आल्या. या चीपमुळे ग्राहकांना कमी पेट्रोल मिळते व त्यांच्याकडून पैसे मात्र पूर्ण घेतले जातात. (उदा- वाहनात पाच लिटर इंधन टाकल्यास चीपच्या मदतीने केवळ ४.८ लिटर पेट्रोल ग्राहकांना मिळते.) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील सहा महिन्यांपासून हा गोरखधंदा या पंपावर सुरू होता. शनिवारी दैनिक ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. हे विशेष.ही कारवाई पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाणे पोलीस कारवाईसाठी विशेष पथक घेऊन नागपूरात आले आहे. या कारवाईमुळे नागपुरातील पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले असून आरोपी विवेक शेट्टीने शहरात कोणकोणत्या पेट्रोलपंपावर अशा प्रकारे चीप बसवून दिल्या याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नवनीत तुलीची होणार चौकशी

रबज्योत पेट्रोल पंप हा नवनितसिंग तुली यांच्या मालकीचा आहे. ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीही लढविली होती. या कारवाईमुळे ते अडचणीत आले आहेत. ठाणे पोलीस नवनितसिंग तुली यांना ठाण्याला चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane crime branch raids petrol pump in nagpur for fuel theft

ताज्या बातम्या