नागपुरमध्ये सध्या राज्य मंत्रिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. राज्याताली अनेक समस्यांवर चर्चा होत आहेत. असे असताना काल(बुधवार) विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी तातडीने मुंबईला गेले होते. विशेष म्हणजे ते सरकारी विमानाने गेले. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत अजित पवारांनी कालही माहिती दिली होती. मात्र, सरकारी विमानातून मुंबईला ते का गेले, याचं नेमकं कारण त्यांनी आज सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “कोणत्यातरी कारणासाठी सरकारी विमान नागपुरला येणार होतं किंवा आलेलं होतं. नंतर त्यांची काहीतरी अडचण झाली होती म्हणून त्यांना ते परत न्यायचं होतं. त्यामुळे त्या विमानातून आम्ही लोक गेलो. वास्तविक ते मोकळं विमान जाणारच होतं आणि येताना आमचं आम्ही रात्रीच्या शेवटच्या विमानाने आलो. त्यामुळे याबाबत गैरसमज नसावा. काहींना असं वाटतंय की यांनी गैरवापर केला. प्रशासनात असताना किंवा नसताना कधीच आम्ही असे गैरप्रकार करणारे माणसं नाहीत. हे एक मला स्पष्ट करायचं होतं.”
अजित पवारांनी काल काय सांगितलं होतं? –
“माझे आज मुंबईला जाण्याचे नियोजन असतानाच उद्या आपण कामकाज सल्लागार समितीची आपण बैठक घेत आहोत, असे मला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही बैठक २८ डिसेंबर रोजी घेण्याऐवजी २९ डिसेंबर रोजी घ्यावी, अशी मी त्यांना म्हणालो. मला आज मुंबईकडे निघायचे असल्यामुळे मी तशी विनंती केली होती. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ऐवजी १० वाजताच आपण ही बैठक घेऊ, त्यानंतर तुमचे मुंबईतील काम करून परत या असे मला शिंदे यांनी सुचवले. याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि मी माझ्या नियोजनात बदल केला. मी आता दुपारी २ वाजता मुंबईला जाणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी काल दिली होती.
याशिवाय, “शासनाचे विमान कोणी वापरावे हा निर्णय सर्वस्वी शासनाच्या प्रमुखांचा असतो. मी विरोधी पक्षानेता आहे. मला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. आम्ही सरकारमध्ये असताना प्रसंगानुसार एकमेकांना सहकार्य करायचो. मी दुपारी १ वाजता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विमानाने मुंबईत जाण्याची शक्यता आहे. त्याच विमानाने परत येण्याचे माझे नियोजन आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितले होते.