अंबाझरी तलावात तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळीवर अंबाझरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. माहेरुन वारंवार पैसे आणण्याचा तगादा लावल्यामुळे त्रस्त होऊन महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना रवी पंडागरे (३५, रा. रायटाऊन, इसासनी) हिने तीन वर्षाची मुलगी खुशीसह ३० जानेवारीला अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दोघींचा मृतदेह ३१ जानेवारीला तलावाबाहेर काढण्यात आला. कल्पना आणि रवी पंडागरे (आमला. ता. बैतूल-मध्यप्रदेश) यांचा २०१९ ला विवाह झाला होता. रवीचे वडिल वायुदलातून सेवानिवृत्त झाले होते तर रवी खासगी कंपनीत नोकरी करीत होता. लग्न होताच त्याने नोकरी सोडली. त्याला दारुचे व्यसन होते.
हेही वाचा >>>पोलिसांची पदोन्नती रखडल्याने राज्यभर ‘खदखद’! विनंती बदली होत नसल्याने अधिकारी नाराज
कल्पना हिला वारंवार माहेरुन पैसे आणण्यासाठी पती रवी हा मारहाण करीत होता. तसेच सासरा संतोषकुमार टेटूजी पंडारे, सासू इंदूबाई, दिर राहुल पंडागरे, ननंद अरुणा अनिल पोटफोडे यांनी तिला माहेरी पाठवले. ‘पैसे आणल्यानंतरच सासरी नांदायला ये, अन्यथा येऊ नको’, अशी धमकी दिली. त्यामुळे ती माहेरी राहायला आली.पतीने तिला परत नेण्यासाठी नकार दिल्यामुळे तिने ३० जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता अंबाझरी तलावात मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कल्पनाचे वडिल दरशथ बारस्कर यांच्या तक्रारीवरून सासू-सासरे, दीर आणि ननंदेसह पतीवरही गुन्हा दाखल केला आहे.