नागपूर: शहरातील प्रमुख तलावांपैकीएक असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण केव्हा होणार असा सवाल करीत काम तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी तलावानजिक राहणाऱ्या नागरिकांनी गांधी जयंतीदिनी गांधींजीचे भजन गाऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले. गांधी सागर तलाव सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू असल्याने त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसू लागला आहे. करारानुसार हे काम दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते लांबतच चालले आहे. तलावात साठलेल्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून त्यापासून विविध प्रकारचे आजार परिसरातील वस्त्यांमध्ये पसरले आहेत.
खोदकामामुळे नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. कामाची गुणवत्ताही निकृष्ट आहे. काही महिन्यापूर्वी बांधलेली भिंत नुकत्याच झालेल्या पावसाने पडली. तलावाच्या कामामुळे मध्यभागी असलेले उद्यानही चार वर्षापासून बंद आहे. येथे योग वर्ग चालायचे ते सुद्धा बंद आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनीयाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी गांधी जयंती दिनी गांधीजींचे भजन गाऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.



