वाशिम : नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी या महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील काटेपुर्णा नदीवर असलेल्या पुलाला खड्डे पडले असून हा पुल क्षतीग्रस्त अवस्थेत आहे.
राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून सन २०२१ मध्ये पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार या पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हा पूल सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील काटेपुर्णा नदीवरील पुलावरून होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, मालवाहतूक गाड्यांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवानेश्र्वरी एस. यांनी दिली आहे.
हेही वाचा – मराठी भाषा विभाग बंद करा, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीची शासनाकडे मागणी
हा महामार्ग बंद राहणार असल्यामुळे अवजड वाहतुकीकरीता पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असून मालेगांव जहाँगीर ते शेलुबाजार- समृद्धी महामार्ग आणि मालेगांव जहाँगीर ते वाशीम-मंगरुळपीर- शेलुबाजार/ कारंजा राष्ट्रीय महामार्ग १६१ व १६२ ई चा वापर करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आदेशातून केले आहे.