भंडारा : कोका अभयारण्यातील परसोडी बिटमध्ये पाच दिवसांपूर्वी (२६ मार्च) टी- १३ या नर वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण हे त्यापेक्षाही अधिक भयंकर आहे. या वाघाचा मृत्यू नैसर्गिक नाही तर एका गुराख्याने सूड भावनेतून वाघावर विष प्रयोग करून त्याचा बळी घेतला, तर दुसऱ्याने नातवाच्या गळ्यात साखळी करण्यासाठी चक्क मृत वाघाची नखे काढली. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून, नरेश गुलाबराव बिसने (५४) आणि मोरेश्वर सेगो शेंदरे (६४) दोघेही राहणार परसोडी, आणि वशिष्ठ गोपाल बघेले (५९) रा. खुर्शीपार, ता. लाखनी अशी आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्य सहवनक्षेत्र चंद्रपूर नियतक्षेत्र परसोडी कक्ष क्र. १८० मध्ये कटांगा नाल्यात २६ मार्च रोजी टी -१३ हा वाघ मृत अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, वाघाचे मागील दोन्ही पाय मोडलेले होते आणि नखे गायब होती. त्यामुळे शंका – कुशंकाना पेव फुटले होते. शव विच्छेदन अहवालात विषप्रयोगाने वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वन विभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर या प्रकरणात लाखनी तालुक्यातील परसोडी येथील दोन आणि खुर्शीपार येथील एका आरोपींना अटक करण्यात आली. मुख्य म्हणजे हे तिघेही शिकारी नसून गुराखी आहेत.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने सरकारचे धिंडवडे निघाले, आमदार खडसेंचे टीकास्त्र, गोपीनाथ मुंडेंबद्दल केले ‘हे’  गौप्यस्फोट…

आरोपी नरेश बिसने आणि मोरेश्वर शेंदरे हे २६ मार्च रोजी जंगलात गुरे घेऊन गेले. परसोडी कक्ष क्र. १८० हे पाळीव प्राण्यांना चरण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र आहे. मात्र बिसने यांची म्हैस प्रतिबंधित क्षेत्रात गेली. तेथे टी-१३ वाघाने तिची शिकार केली. प्रतिबंधित क्षेत्रात वाघाने शिकार केल्यामुळे वनविभागाकडून आपल्याला मोबदला मिळणार नाही, असे बिसने यांना वाटू लागले. ‘आमचे नुकसान झाले. त्याचा मोबदलाही मिळणार नाही मग तुमचेही (वनविभागाचे ) नुकसान करू’ या सूड भावनेतून बिसने यांनी मृत म्हशीच्या अंगावर कोरोजन हे कीटकनाशक टाकून ठेवले. काही वेळानंतर वाघ पुन्हा शिकार खाण्यासाठी आला. विषयुक्त शिकार खाल्ल्यानंतर पाणी पिण्यासाठी गेलेल्या वाघाचा नाल्यातच मृत्यू झाला. तपासाअंती आरोपी नरेश बिसने आणि मोरेश्वर शेंदरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाघाची नखे कोणी काढली या दिशेने तपास सुरू झाला. त्यात खुर्शिपार येथील वशिष्ठ बघेले हा आरोपी दोषी आढळला.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बघेले गुरे चारण्यासाठी जंगलात गेला असता त्याला वाघ मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसला. वशिष्ठला त्याच्या नातवासाठी साखळी करायची होती. त्यात लॉकेट म्हणून वाघ नखे लावण्याचा अघोरी मोह त्याला आवरला नाही. त्यामुळे त्याने वाघाची नखे काढून घेतली. मृत वाघाचे समोरचे पाय पाण्यात होते त्यामुळे मागच्या पायांची नखे त्याने काढली. सदर आरोपीकडून ७ वाघ नखे हस्तगत करण्यात आली असून, अटक केलेल्या तिनही आरोपीस आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘त्या’ शावकांच्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने प्रवास सुरू

सदर प्रकरणात नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयराम गौडा आर., नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक पवन जेफ., कोका वन्यजीव अभयारण्यचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन बी. राठोड यांच्या मार्गदर्शनात, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, सचिन नरळ यांच्या सहकार्याने तपास करण्यात आला. पुढील कार्यवाही कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव माकडे व इतर क्षेत्रीय कर्मचारी करीत आहेत.

अंधश्रद्धेतून वाघाची शिकार

वाघांच्या नखांचा उपयोग ताईत बनविण्यासाठी केला जातो. त्यासाठी वाघाची शिकार केली जाते. शर्यतीच्या बैलांच्या गळ्यात वाघाच्या नखांचे ताईत लावल्यास बैलात वाघासारखी ताकद येते, या अंधश्रद्धेतून वाघाची शिकार करण्याचे प्रकार घडत असतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The claws of a dead tiger were removed to make a chain around the grandsons neck in bhandara ksn 82 ssb
First published on: 31-03-2023 at 17:47 IST