हवामान खात्याच्या अंदाजावर कितपत विश्वास ठेवावा, हा वादाचा विषय होऊ शकतो. मात्र, साहित्य संमेलनाचे मंडप उभारणाऱ्या कंत्राटदाराने त्यावर चटकन विश्वास ठेवत खबरदारीचे उपाय सुरू केले आहे.३, ४ व ५ फेब्रुवारीस होत असलेल्या साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास पोहचली आहे. मुख्य भव्य असा सभा मंडपच तयार व्हायचा आहे. असे उत्सवी वातावरण शिगेला पोहचत असताना पावसाची शक्यता मंडप कंत्राटदार नितीन शिंदे यांना लागली. या काळात पावसाबद्दलचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असल्याचे त्यांना ऐकायला मिळाले. त्या बाबत त्यांनी काहींना विचारून खातरजमा केली. तू खबरदारी घे, असा सल्ला मिळाल्यावर शिंदे यांनी आज सकाळपासून मंडपाभोवती चरे खोदण्याचे काम स्वखर्चाने सुरू केले.
आपणास आयोजकांची सूचना नाही. पण रविवारचे आभाळी वातावरण व वेधशाळेचा अंदाज कानी पडल्यावर मीच खबरदारी घेत आहे. जमिनीवर टाकलेले हिरवे जाजम ओले झाल्यास त्यावर डाग पडतात. ते मग कधीच निघत नाही. लाखो रुपयांचे नुकसान होते. पाऊस पडो न पडो, काळजी घेणे आवश्यक म्हणून आज उपाय सुरू केले. संमेलन निर्विघ्नपणे पार पडो ही तर माझी प्रार्थना आहे, असेही शिंदे यांनी काळजीयुक्त स्वरात नमूद केले.