नागपूर : दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते. परंतु या मुद्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. याविरोधात नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने कॉटन मार्केट चौकातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केेली. आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या कृतीचा निषेध केला. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी दुनेश्वर पेठे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील घटनेचा निषेध केला. या कृतीमुळे शिंदे- फडणवीस सरकारच्या मनात या दोन कर्तबगार स्त्रियांबद्दल किती आदर आहे हे महाराष्ट्राला कळाले, अशी टीका त्यांनी केली. पुतळे हटवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनामध्ये ईश्वर बाळबुद्धे, अविनाश काकडे, अफजल फारुकी, श्रीकांत घोगरे, लक्ष्मीताई सावरकर,नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंह, महेंद्र भांगे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.