नागपूर: भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी, कृषी महर्षी व अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न उपाधीने गौरविण्यात यावे ही मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यामुळे या मागणीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहेत.

या संदर्भात एका शिष्टमंडळाने नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळामध्ये कुलगुरू डॉ. प्रकाश घवघवे, कृषी विभागाचे माजी उपसंचालक डॉ. मंगेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेशराव कुकडे, डॉ. दिगंबर आळशी, प्रा. भगवान कोलते, डॉ. सुरेश खोंडे भारतीय कृषक समाजाचे डॉ. सुभाष नलांगे, वामनराव उमरे, मधुकर बरडे व डॉ. दिघेकर यांचा समावेश होता.

हेही वाचा – Video : चालकाला आततायीपणा नडला, पुरात ट्रॅक्टर वाहून गेला; थरारक व्हिडीओ एकदा पाहाच…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांना दिलेल्या या निवेदनामध्ये शिक्षण महर्षी व कृषी महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर डॉ. पंजाबराव देशमुखांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने भारत सरकारने १२५ रुपयांचे नाणे काढल्याबद्दल भारत सरकारचे या शिष्टमंडळाने आभार मानले. मात्र, भारतरत्न द्यावे म्हणून थेट सरसंघचालकांची भेट घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे सरसंघचालकांनी या मागणीला दुजोरा दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा – अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर

मोदी शहा यांचीही भेट घेणार

डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती असल्यामुळे त्यांना त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून यावर्षी भारतरत्न ही उपाधी देऊन गौरव प्रदान करण्यात यावा असेही निवेदनात नमूद केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी प्राप्त व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. याविषयी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य यांची एक सभा आयोजित केली आहे. या सभेत हा ठराव सर्वानुमते मांडण्यात येणार आहे. त्यानंतर या खासदारांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटून डॉ. पंजाबराव देशमुख यांचा भारतरत्न म्हणून उपाधी देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी करणार आहेत. अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख भारतरत्न समितीचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. व्ही. टी. इंगोले व संयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.