अकोला : संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे राजराजेश्वरनगरी दोन दिवसांपासून भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. भगव्या पताका, अश्व, दिंडी, टाळ-मृदंगाचा गजर, ७०० वारकरी, मुखी हरिनामामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ‘श्रीं’च्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.
संत नगरी शेगाव येथून विठूमाऊलींची भेट घेण्यासाठी ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली. पालखी सोहळ्याचे यंदाचे ५४ वे वर्ष आहे. ‘श्रीं’च्या पालखीचे अकोला शहरात ठिकठिकाणी भक्तिभावात स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळीने सजावट करण्यात आली. वारकऱ्यांना अनेक ठिकाणी प्रसाद, थंडपेय व विविध साहित्यांचे वाटप केले. मार्गामध्ये पालखीपुढे हजारो भाविक नतमस्तक झाले. ‘विठ्ठल माझा.. विठ्ठल माझा..मी विठ्ठलाचा’, जय हरी विठ्ठल, गण गण गणात बोते, पांडुरंग हरी माऊली, ‘श्री गजानन, जय गजानन…’ आदी जयघोषाने शहर दुमदुमले आहे. रविवारी रात्री मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात पालखीचा मुक्काम होता. याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.




श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीतर्फे वारकरी भक्तांसाठी व्यवस्था केली. मुंगीलाल बाजोरिया विद्यालय मैदानावरुन पालखी सोमवारी सकाळी ६ वाजता पुढे निघाली. जिल्हाधिकारी निवास, सिव्हिल लाईन, गाेरक्षण मार्ग, जुने इन्कम टॅक्स चौक मार्गे आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६ येथे दाखल झाली. दुपारी विश्रांती व महाप्रसादाच्या वितरणानंतर पालखी सिंधी कॅम्प मार्गे दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून, अशोक वाटिका, सर्वोपचार रुग्णालय, सरकारी बगीच्या, खोलेश्वर मार्गे शहर कोतवाली चौक, जय हिंद चौक, राजराजेश्वर मंदिरासमोरून, हरिहर पेठमधील जिल्हा परिषद टाऊन शाळेत दाखल झाली. शाळेत रात्रीचा मुक्काम करून पालखी मंगळवारी सकाळी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे.
सेवाभावाची परंपरा कायम
संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अकोला शहरातील नागरिकांनी आपल्या सेवाभावाची परंपरा कायम राखली. शहरात विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा नि:शुल्क पुरवण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांना कपडे, चप्पलांसह इतर साहित्यांचे वाटप केले. पालखी मार्गावर पाण्याचा शिडकाव करून स्वच्छता करण्यात आली होती. पालखी सोहळ्यानिमित्त शहर पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.