नागपूर / पुणे : राज्य शासनाच्या ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी बुधवारी दुसऱ्यांदा घेतलेल्या चाळणी परीक्षेचा पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याचा आरोप करीत परीक्षार्थीनी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रावर आंदोलन केले.

सरकार पारदर्शक परीक्षा घेऊ शकत नसल्याने चाळणी परीक्षा रद्द करून सर्व अर्जदारांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून पेपरफुटीचा आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी २४ डिसेंबरला परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत २०१९च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यावर आक्षेप घेऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीत आधीची परीक्षा रद्द करून १० जानेवारीला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>>सुनील केदार कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष अन् घोषणाबाजीने…

त्यानुसार बुधवारी नागपूर येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सकाळी परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, प्रश्नपत्रिका सीलबंद लिफाफ्यात नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ‘ए’ आणि ‘बी’ या दोन ग्रुपची प्रश्नपत्रिका सीलबंद लिफाफ्यात होती. मात्र ‘सी’ आणि ‘डी’ ग्रुपची प्रश्नपत्रिका ही खुली होती. त्यामुळे पेपर फोडण्यात आला, असा आरोप करीत परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी कमला नेहरू महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या विरोधात नारेबाजी केली. या आंदोलनात काही वेळाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (अभाविप)ने उडी घेतली. ‘अभाविप’चे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी ‘अभाविप’चे अमित पटले व कार्यकर्त्यांना अटक केली.

हेही वाचा >>>नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल, काही पदावर होणार आता अशी निवड

दरम्यान, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्था शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती देण्याची मागणी आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पत्राद्वारे राज्य सरकारकडे तशी मागणी केली आहे. संशोधक विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. त्यांची अशी परवड महाराष्ट्राला शोभणारी नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी दिली.

‘आरोप निराधार’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक प्रा. बी. बी. कापडणीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. पुणे, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेसाठी ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ अशा चार प्रश्नपत्रिका संचाची छपाई दोन मुद्रणालयांकडून गोपनीयरित्या, सर्व सुरक्षा मानकांचे करून घेतली होती. त्यामुळे छपाईच्या स्वरूपामध्ये बदल असू शकतो. प्रश्नपत्रिका संच परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरूपात पोहोचवण्यात आले होते. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे परीक्षेच्या पेपरफुटीबाबत केलेले आरोप पूर्णत: निराधार आहेत, त्यात तथ्य नाही,’ असे नमूद करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.