पिढ्यानपिढ्या शेतीच्या आर्थिक वर्षास गुढीपाडव्यास प्रारंभ होत आहे. म्हणजे या दिवशी वर्षभर शेतीवर राबणाऱ्या सालकऱ्याशी बोलणी होते. त्याची मजुरी ठरून त्याला कामावर ठेवल्या जाते.पण यासोबतच अन्य सोपस्कार आवडीने पूर्ण केल्या जाण्याची प्रथा राज्यभर पाळल्या जाते.ही प्रथा म्हणजेच ' सांजोनी 'होय. हेही वाचा >>>बुलढाणा: ‘समृद्धी’वर वन्यप्राण्यांचा मोकाट वावर, असा आहे एका प्रवाशाचा विदारक अनुभव… आता ही प्रथा लुप्त होत असली तरी काही भागात मात्र ती मनोभावे पाळल्या जाते. गुढीपाडवा ते रामनवमी उत्सवापर्यंत हा सोपस्कार चालतो. शेतीत भरभराट व्हावी म्हणून गुढी उभारत प्रार्थना करतात.शेतीची औजारे सज्ज केल्या जातात. बैलांना आंघोळ करीत सजविल्या जाते.पहिल्या उन्हाळवाही साठी नांगर फाळ लावून ठेवल्या जातो. नैवैद्यात नव्या गव्हाच्या पोळ्या,मुंग डाळीची भाजी, दूध तूप गूळ असतो. शेतमालक शिदोरी सोबत हे पदार्थ घेवून शेतात जातो.तिथे भूमातेची पूजा होते.शिवारातील देवदेवकांना पुजल्या जाते. दहीभात शिंपडून नांगरणीस थोडी सुरवात होते. बैलांना वैरण दिल्यानंतर सर्व मंडळी गोलाकार बसून न्याहारी करतात.मग घरी परतल्यावर गृहलक्ष्मी सर्वांना ओवाळते. पूर्वी ही प्रथा घरोघरी उत्साहात साजरी व्हायची.आता ही प्रथा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ही प्रथा नेमाने पाळणारे सोनेगाव येथील जयंत व वैशाली येरावार हे दाम्पत्य बोलून दाखवितात.