राज्यातील विविध भागात निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघता केवळ समिती स्थापन करून प्रश्न सुटणार नाही तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवणे आवश्यक आहे आणि त्यात केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे अपयशी ठरल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने दिग्विजय सिंग नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात कितीवेळा दुष्काळग्रस्त भागात दौरा केला आहे? शेतकरी आत्महत्या करीत आहे, पिकांची हानी होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, असे अनेक प्रश्न असताना केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करणे म्हणजे केवळ देखावा आहे. समितीने भेटी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. चष्मा न घालता आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतो. शेतकऱ्यांच्या समस्या दिसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राधामोहन सिंग यांना चष्म्याची खरी गरज असल्याचे मत व्यक्त करून त्यांच्यावर दिग्विजय सिंग यांनी टीका केली.
लालुप्रसाद यादव यांनी शरद यादव यांच्यावर सेवानिवृत्त नेते म्हणून टीका केली त्यावर दिग्विजय सिंग यांनी त्या संदर्भात माहिती नाही, असे सांगून या विषयावर बोलणे टाळले.