नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहितीच्या अधिकारात महापालिकेच्या रुग्णालयात किती प्रसूती झाल्या याबाबतची माहिती मागण्यात आली होती. त्यावर दिलेल्या उत्तरात आरोग्य विभागाने प्रसूतींची आकडेवारीच चुकवली आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या रुग्णालयांत २०१९ ते २०२४ दरम्यान एकही मृत्यू झालेला नाही. प्रसूतीबाबत दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२९ दरम्यान येथील रुग्णालयांत १०६ प्रसूती झाल्याचे दर्शवले गेले. त्यात ५१ मुले व ५२ मुली जन्मल्या. परंतु जन्मलेल्या मुले-मुलींची बेरीज १०३ होत असल्याने प्रसूतीची संख्या महापालिकेने १०६ केली कशी? हा प्रश्नच आहे. त्यातही सध्या २०२४ हे वर्ष सुरू असताना महापालिकेने उत्तरात ‘२०२९ पर्यंतचे’ असे नमुद केले आहे. हेही वाचा >>>वन महोत्सवातील लोकसहभाग हरवला १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान ३१६ प्रसूती झाल्याचे दर्शवले आहे. त्यात १५२ मुले व १६५ मुली जन्मल्या. मुले-मुलींच्या जन्माची बेरीज ३१७ होते, त्यामुळे महापालिकेने ३१६ प्रसूती कशा दाखवल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान या रुग्णालयांत ९८ प्रसूती झाल्याचे नमुद आहे. त्यात ४० मुले तर ५९ मुली जन्मल्याचे दर्शवले आहे. परंतु जन्मलेल्यांची संख्या ९९ होत आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २२ दरम्यान १०४ प्रसूती झाल्या व ५७ मुले व ४७ मुली जन्मल्याचे सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी जुळत आहे. परंतु त्यानंतर २०२२-२३ आणि २०२३-२४ वर्षातील प्रसूती व जन्मलेल्या बाळांची आकडेवारी जुळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना गणिताचे वर्ग लावण्याची गरज असल्याचा संताप माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी व्यक्त केला. हेही वाचा >>>बच्चू कडू म्हणतात, तिसरी आघाडी नव्हे, आमची शेतकरी, कष्टकऱ्यांची स्वतंत्र आघाडी’ करोनाचे १९ मृत्यू मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयांसोबतच महापालिकेच्या रुग्णालयांतही गंभीर करोनाग्रस्तांवर उपचार झाले. जून २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान महापालिकेच्या रुग्णालयांत १९ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले आहे. चार हजारांवर आंतरुग्णांवर उपचार महापालिकेच्या विविध रुग्णालयांत १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२४ दरम्यानच्या काळात ४ हजार ९५ दाखल रुग्णांवर तर ३९ लाख १३ हजार ४६५ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार झाले.