अकोला : नागपूर येथून हरवलेल्या एका १४ वर्षीय बालकाला संत्रीमुळे आई-वडिलांचे वात्सल्य पुन्हा मिळाले. अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी मुलाला त्याचे पालक भेटले. हरवलेल्या मुलाला पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. अकोला रेल्वेस्थानकावर २५ एप्रिल रोजी १४ वर्षीय बालक आढळला होता. ‘चाईल्ड लाईन’च्या चमूने या बालकास विचारपूस केली, मात्र तो काही सांगण्यास तयार नव्हता. केवळ ‘घरी जायचे नाही’ असे वारंवार सांगत होता. त्याच्या बोलीभाषेवरुन तो हिंदी भाषिक असल्याचे लक्षात आले. या बालकाचे कुटुंब शोधण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कालावधीत हरवलेल्या बालकास वर्ग सहावीमध्ये प्रवेश देण्यात आला. दरम्यान, बालगृहामधील बालकांना संत्री वाटप करताना या मुलाने ‘हमारे नागपुर की संत्री प्रसिद्ध है’, असे उद्गार काढले. त्याच्या या वाक्याने बालगृहातील अधीक्षीका जयश्री वाढे व समुपदेशक नंदन शेंडे यांनी बालकाला विश्वासात घेत विविध माध्यमातून त्याच्या घराचा पत्ता माहिती करुन घेतला. या पत्त्यावर नागपूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व समुपदेशक अनिल शुक्ला यांनी भेट देऊन शोध घेतला. परंतु, बालकाच्या पालकांचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर समुपदेशक नंदन शेंडे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे मुलाला त्याने सांगितलेला परिसर दाखविला.

हेही वाचा : गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार : सुधीर मुनगंटीवार

मुलाने लगेच एका परिसराची ओळख पटविली. मी या भागात भागात राहत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊन बालक व त्याच्या पालकांमध्ये संवाद घडवून ओळख पटवण्यात आली. हरवलेल्या बालकाचा चेहरा दिसताच त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातआनंदाश्रू दाटून आले. हा मुलगा गेल्या सहा महिन्यापासून कुटुंबाच्या संपर्कात नव्हता. अखेर सोपस्कार पूर्ण करुन बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बालकाला त्याच्या वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला व नागपूर तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, चाईल्ड लाईन यांच्या प्रयत्नाने हरविलेल्या बालकाला आई-वडिलांचे वात्सल्य पुन्हा प्राप्त झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lost child regained the affection of his parents thanks to the oranges of nagpur akola railway station tmb 01
First published on: 27-09-2022 at 12:33 IST