महापालिकेच्या शैक्षणिक दृष्टीकोनातील उणेपण उघड
खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न न करता केवळ मुलांच्या गणवेशात बदल केल्याने महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातील उणेपण उघड झाले आहे.
महापालिकेने खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसारखे गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा कमजोर गटातील विद्यार्थ्यांना देखील चांगला गणवेश मिळावा, याची महापालिकेला जाणीव झाली हे एका तऱ्हेने बरेच झाले मात्र, मात्र गणवेशाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक चमक दिसण्यासाठी नेटाने प्रयत्न होणही तेवढेच आवश्यक आहे. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईलही परंतु, मुळात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावल्यास त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होऊन उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा होणार आहे.
महापालिकांच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प शिक्षित पालकांची मुले अधिक असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून गृहपाठाची अधिक अपेक्षा करता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून मुले अधिकाधिक काळ शाळेत कशी राहतील आणि त्यांचा गृहपाठ शाळेत पूर्ण करण्यावर भर दिला गेला पाहिजे. तत्कालिन आयुक्तांनी विविध शाळांना भेटी दिल्यानंतर महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. अनेक शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुणकार, भागकार करता येत नाही. पाढे पाठ नाहीत तसेच इंग्रजी बाराखडी नीट लिहिता, वाचता येत नसल्याचे निदर्शनास आले होते. यावर उतारा म्हणून गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन परिवर्तन’ उपक्रम सुरू केला होता. शाळा सुरू होण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या प्रार्थनेच्यावेळी विद्यार्थ्यांकडमून पाढे म्हणवून घेणे, इंग्रजी बाराखडीचे पाठांतर करवून घेण्याचा हा उपक्रम आहे. याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी संगणक ज्ञान, क्रीडा उपक्रम, इंग्रजीतून संभाषण आदींवर लक्ष देणे आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्थळांना भेट घडवून आणून त्यांच्यातील न्यूनगंड घालवण्याचे उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेच्या सध्या १८४ शाळा सुरू आहेत. मराठी माध्यमाच्या प्राथिमक शाळा ६२, हिंदी माध्यमाच्या ६३, ऊर्दू माध्यमाच्या ३१ आणि इंग्रजी माध्यमाच्या २ शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळा १८, हिंदी माध्यमाच्या ११ आणि ऊर्दू माध्यमाच्या ९ शाळा आहेत. महापालिकेची चार कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात तीन विज्ञान शाखेची आहेत, अशी माहिती शिक्षण समितीचे अध्यक्ष गोपाल बोहरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांअभावी ५३ शाळा बंद
विद्यार्थी मिळत नसल्याने गेल्या १५ वर्षांत ५३ शाळा बंद झाल्या आहेत. बंद शाळांपैकी ३ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. २१ शाळांना कुलूप लागले आहे तर २९ शाळांच्या इमारतींमध्ये महापालिका कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय, पोलीस ठाणे उघडण्यात आले आहे. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाने मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी ८ शाळांची मागणी केली आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी