नागपूर : गेल्या दहा वर्षांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण १० टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गर्भाशयातील क्षयरोगामुळेही वंध्यत्व वाढत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
याबाबत माहिती देताना इंडियन फर्टिलिटी सोसायटी, विदर्भ शाखा आणि द नागपूर ऑबस्ट्रिक ॲन्ड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख पत्रपरिषदेत म्हणाल्या, दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण १० टक्के होते. बदलती जीवनशैली, विलंबाने होणारे लग्न, लग्नानंतर विलंबाने घरात पाळणा हलणे, आहाराच्या वाईट सवईंमुळे वंध्यत्वाचे प्रमाण १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
हेही वाचा – वर्धा : तिसऱ्या वर्गातील अर्णवी भरतनाट्यममध्ये विक्रमासाठी सज्ज
डॉ. बिंदू चिमोटे म्हणाल्या, महिलांमध्ये गर्भाशयातल्या क्षयरोगाचाही विळखा वाढत आहे. परिणामी, महिला मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहत आहेत. परंतु, आधुनिक वैद्यक शास्त्रामुळे यावर मात करता येते. डॉ. प्रगती खळतकर म्हणाल्या, महिलांमध्येही करिअरच्या नादात उशिरा विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या गरोदरपणावर होतो. डॉ. अर्चना कोठारी म्हणाल्या, शहरांमध्ये तिशीनंतर विवाह करणाऱ्या शंभर जोडप्यांपैकी २० जोडपी वंध्यत्वाच्या उंबरठ्यावर आहेत. जननप्रक्रियेतले दोष, अंतस्त्रावी ग्रंथी, संप्रेरके हे गरोदरपणात महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. आरती वंजारी म्हणाल्या, आधुनिक वैद्यक शास्त्राची मदत घेऊन वंध्यत्वाची जोखीम कमी करता येते. याप्रसंगी डॉ. स्वाती सारडा, डॉ. माधुरी वाघमारे, डॉ. श्वेरा हारोडे, डॉ. नेहा वर्मा यांनीही आपले मत मांडले.
स्त्रीरोग तज्ज्ञांची वार्षिक परिषद ४ जूनपासून
इंडियन फर्टिलिटी सोसायटी विदर्भ चाप्टर आणि नागपूर ऑबस्ट्रटिक अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या वतीने ३ व ४ जून रोजी दोन दिवसीय वंध्यत्व परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत गर्भाशय आणि त्यावरील भाग हा विषय केंद्रस्थानी असेल. या परिषदेत देश-विदेशातील स्त्रीरोग तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.