scorecardresearch

यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी वैयक्तिक कारणामुळे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडत असल्याचे कळविले आहे. पिंगळे यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : डोक्याखाली पर्स ठेवून झोपने महिलेला भोवले ; अहमदाबाद एक्स्प्रेस चोरी

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे कट्टर समर्थक असलेले पिंगळे गेल्या सहा वर्षांपासून जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना फुटल्यानंतर राठोड एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले, तेव्हा पिंगळे हे शिंदे गटात जातील, अशी अटकळ होती. मात्र, त्यांनी पक्षनिष्ठा जपत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला. पिंगळेंच्या या निर्णयामुळे त्यावेळी राठोड यांनाही धक्का बसला होता. राठोड पक्षातून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला चेहरा नव्हता. तेव्हा पक्षातील वरिष्ठ नेते आणि सामान्य कार्यकर्ते यांच्याशी नाळ जुळलेले पदाधिकारी म्हणून पिंगळे यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षवाढीसाठी पक्षातून त्यांना मोठे पाठबळ मिळत असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : खराब रस्त्याने घेतला आदिवासी गर्भवती महिलेचा बळी ; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू

संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीमुळे दुखावले!
याबाबत पिंगळे यांना विचारले असता, ‘आपण राजीनाम्याचे कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविले आहे. आपल्याला याबाबत अधिक बोलायचे नाही’, असे सांगितले. मात्र, शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती मान्य नसल्याची खंत व्यक्त करत, पिंगळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचे कट्टर विरोधक असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती ही कोणत्याही हिंदुत्ववादी कट्टर शिवसैनिकास दुखवणारी आहे, असे मत त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पत्राद्वारे कळविल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र या पत्राची वरिष्ठांनी कोणतीही दखल न घेतल्याने ते दुखवल्याचे सांगण्यात येते.

राजीनामा दिल्यानंतर पराग पिंगळे पुन्हा संजय राठोड यांच्यासोबत जुळवून घेतात की, भाजपात जातात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या