वडिलांची माहितीच नसल्याने अभियांत्रिकीची पदवी अडचणीत; उच्च न्यायालयाचे तात्पुरते संरक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले असताना जातीशिवाय जगणेही अशक्य असल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. जातीविना एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या शिक्षणावर गदा येणार असताना वडिलांचा पत्ता नसल्याने ती मुलगी आपल्या आईची जात मिळावी, याकरिता कायदेशीर लढा देत आहे. या विद्यार्थिनीची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तिचे शिक्षण संरक्षित करण्याचे तात्पुरते आदेश दिले.

‘गायत्री’ (नाव बदललेले) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती आपल्या आईसह रामेश्वरी परिसरात राहाते. तरुण वयात भरकटल्याने विवाहापूर्वीच तिची आई गर्भवती झाली. मात्र, तिने गर्भपात न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. गायत्रीच्या जन्मानंतर तिच्या आईचे संपूर्ण आयुष्यच बदलले. त्यानंतर तिने कधीच गायत्रीच्या वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुलीला सन्मानाने जगविण्यासाठी ती खंबीरपणे समाजाचा सामना करू लागली. मुलीला चांगले शिक्षण दिले. शिक्षणासाठी वडिलांच्या नावांची गरज होती. मात्र, गायत्रीच्या नावासमोर तिच्या आईचे नाव आहे. बारावीमध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर गायत्रीला अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे तिने आईच्या दस्तावेजाच्या आधारावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून काढले. त्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केला. हा अर्ज विचाराधीन असताना अभियांत्रिकीला प्रवेश मिळविला आणि आता ती अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांला पोहोचली आहे. दरम्यान, जानेवारी २०१७ मध्ये जात पडताळणी समितीने वडिलांच्या दस्तावेजाअभावी तिचा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव फेटाळला. आजवरच्या इतिहासानुसार मुलांना वडिलांचीच जात मिळत असून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीही वडिलांचे दस्तावेज सादर करण्यास तिला सांगण्यात आले. मात्र, वडिलांना कधी बघितले नाही, त्यांचे नावही माहीत नाही किंवा त्यांचा पत्ताही नसताना, त्यांना शोधायचे कुठे, असा प्रश्न गायत्री आणि तिच्या आईसमोर उभा ठाकला.

जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यास गायत्रीची शिष्यवृत्ती बंद होणार होती. तिच्या प्रवेशावरही गदा येऊन तिचा अभियांत्रिकीची पदवीही पूर्ण होईल की नाही, यात शंका निर्माण करण्यात आली. त्यामुळे शेवटी तिने न्यायालयाचे दार ठोठावले. तिच्या प्रकरणावर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने गायत्रीची बाजू ऐकली आणि तिचे प्रवेश तात्पुरते संरक्षित केले. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

मुलीला आईची जात मिळावी

प्रेम करताना समोरच्याने स्वत:चे नावही खोटे सांगितले आणि त्यानंतर घडलेला सर्व प्रकार न्यायालयाच्या समोर आहे. अशा व्यक्तीला शोधायचे कुठे, हा असल्याने त्याचा शोध न घेताच आईने आपल्या मुलीला वाढविले. अशात तिची जात ठरविण्याची वेळ आली आहे. वडील माहीतच नसल्याने मुलीला तिच्या आईची जात देण्यात यावी, तिला तिच्या आईची जात नाकारल्यास तिला शिक्षण घेता येणार नाही का? असा सवाल तिचे वकील अनंता रामटेके यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of engineering student who dont know her father name
First published on: 09-07-2017 at 01:09 IST