scorecardresearch

नागपूर : वकील होण्याचे होते युवकाचे स्वप्न, पालकांच्या आग्रहामुळे अभियांत्रिकीला घेतला प्रवेश; नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

युवकाने वकील दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. यापूर्वीही त्याने अनेकदा मित्रांना आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता.

नागपूर : वकील होण्याचे होते युवकाचे स्वप्न, पालकांच्या आग्रहामुळे अभियांत्रिकीला घेतला प्रवेश; नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
प्रातिनिधिक फोटो

मोठा वकील होवून सामान्यांची सेवा करण्याचे स्वप्न विद्यार्थ्याने उराशी बाळगले. मात्र, आईवडिलांचे स्वप्न मुलाला अभियंता बनवायचे होते. त्यामुळे मुलाने विधी महाविद्यालयात प्रवेश न घेता अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. मात्र, स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. महाविद्यालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. योगेश विजयकुमार चौधरी (२०, रा. भुसावळ. जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

हेही वाचा- राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार चौधरी हे आयुध निर्माण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना एकुलता एक मुलगा योगेश याला यशस्वी अभियंता बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी मुलाकडून तयारी करवून घेतली. मात्र, योगेशला वकिल बनायचे होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तो विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड करीत होता. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याला नागपुरातील हिंगणा रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. प्रथम वर्षाला शिक्षण घेत असताना तो महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होता. त्याच्या खोलीत अन्य काही विद्यार्थीसुद्धा होते. ‘मला वकील बनायचे होते. परंतु, नाईलाजाने मला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे लागत आहे. आता मला छतावरून उडी घेऊन आत्महत्या करावी वाटते.‘ असे तो मित्रांना सांगत होता. परंतु, मित्रांना तो मस्करी करीत असल्याचे वाटत होते.

हेही वाचा- नागपूर: अखेर ‘त्या’ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निलंबनाचे आदेश निघाले

योगेशने शुक्रवारी वकील दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मोठा आवाज आल्याने विद्यार्थ्यांनी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने योगेशला रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 19:19 IST

संबंधित बातम्या