नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. स्मार्ट पोलिसांच्या गस्तप्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहे. चक्क तहसील पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून असलेल्या श्री केतेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. त्यातून ५० ते ६० हजार रुपये चोरून नेले. हा सर्व प्रकार सुरू असतानाच पोलीस ठाण्यात जवळपास ३० ते ४० पोलीस कर्मचारी हजर होते. मात्र, ही चोरी एकाही पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही. त्यावरून पोलीस कायदा सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागूनच श्री केतेश्वर मंदिर आहे. येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दानपेटीत मोठी रक्कम जमा होत असते. हीच बाब हेरून चोरट्याने कट रचला. मात्र, पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मंदिरात चोरी करणे म्हणजे खूपच जिकरीचे काम असल्याचे वाटत होते. तरीही बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांची गस्तप्रणाली बिघडल्यामुळे मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडली. दानेपेटीतील रक्कम एका बॅगमध्ये भरली आणि पोलीस ठाण्यासमोरूनच निघून गेला. त्या चोरावर कुत्रे भुंकत होते. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला. गुरुवारी सकाळी सहा वाजता मनोहर पत्रेवार यांचा मुलगा मंदिरात गेला असता त्याला दानपेटी फुटलेली दिसली. त्याने वडिलांना माहिती दिली. पत्रेवार यांनी मंदिराचे विश्वस्त यांना माहिती देऊन तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ‘सीसीटीव्ही’वरील फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे, अशी प्रतिक्रिया तहसीलचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांनी दिली.
हेही वाचा – धक्कादायक! चार वर्षांपूर्वी मृत व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेचे ‘व्हाउचर’
मागील आठवड्यातही मंदिरात चोरी
गेल्या आठवड्यातच कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील एका मंदिरात चोरी झाली होती. त्या मंदिरातील दानपेटीतूनही रक्कम चोरून नेण्यात आली. या घटनेचा अद्याप छडा लागला नाही. कोतवाली ठाण्यासमोरच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. तरीही अतिआत्मविश्वास असलेल्या कोतवाली पोलिसांसमोरच मंदिरात चोरीची घटना घडली होती. तसेच बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली असून रक्कम गायब केली आहे.