लोकसत्ता टीम वर्धा : सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठातील एमबीबीएस द्वितीय शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. प्रशासनाच्या जाचाला कंटाळून पूजाने आत्महत्या केली. तिला तीन विषयात डिटेन करण्यात आले होते. यामुळे ती परीक्षेपासून वंचित ठरणार होती. तिची ७५ टक्के गैरहजेरी होती म्हणून विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. त्याच तणावातून पुजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे आरोप विद्यार्थी करीत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी संतप्त विद्यार्थ्यांना सामोरे जात दिलेले उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे. चुकले असेल तर मी स्वतः माझा खून करून घेईल. पण वाद करण्याचा प्रकार चुकीचा आहे. शिस्तीत काय चुकीचे असेल तर बदल करू, असे डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले. मृत पूजा हिच्या आईवडिलांनी सहकार्य केले. पोलीस केस आम्ही करणार नाही. पण झाली तर खरं काय ते सांगणार, असेही स्पष्ट करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. पोलिसांना त्यांनी नव्हे तर आम्ही तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी व्हावी, ही त्यांची मागणी आम्ही मान्य केली. एवढेच नव्हे तर शिस्त व हजेरी याबाबत काही सुधारणा अपेक्षित असेल तर त्यासाठीही विद्यापीठ सुधार समिती गठीत करणार. मी फार उद्विग्न झालो आहे. परीक्षा ही विद्यापीठ पातळीवर नव्हे तर वर्गापुरती मर्यादित अशीच होती. त्यात उत्तीर्ण झाल्यास गुण मिळतात. तो शिस्तीचा भाग असतो. अनुत्तीर्ण झाल्यास फरक पडत नाही. पुजाच्या पालकांना मुलीची अवस्था माहित होती. ते आक्रमक नव्हतेच, असेही कुलगुरू डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले. आणखी वाचा-अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांबाबत दुजाभाव; आमदार यशोमती ठाकूर यांचा आरोप या प्रकरणात विद्यार्थी एकदम आक्रमक का झाले, याचे दुसरे कारण म्हणजे एकाचवेळी ४५ विद्यार्थ्यांना कारवाई करीत परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. प्रशासकीय वर्तुळ फार नियमाबाबत आग्रही असते. आम्ही चुकलो पण कारवाई किती कठोर, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला होता. म्हणून आजच्या आत्महत्येच्या घटनेत या विद्यार्थ्यांनी आपला राग व्यक्त केला. त्यांना शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत होता. मात्र ते ऐकायलाच तयार नसल्याने कुलगुरू डॉ. वाघमारे यांनी खून करून घेण्याची निर्वाणीची भाषा वापरली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. कुलगुरू व अन्य प्रशासन पूजाच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर आश्वस्त असल्याचे दिसून येत आहे.