कोटय़वधीची वीजबचत शक्य

उपराजधानीत ढगाळ वातावरणामुळे काही दिवस सोडले तर बहुतांश दिवस चांगला सूर्यप्रकाश असतो. त्यातून मोठय़ा प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती शक्य आहे, परंतु त्याकडे शासनासह नागपूर महापालिकेचेही दुर्लक्ष आहे. स्मार्ट सिटी योजनांतर्गत शहरातील प्रत्येक घर व इमारतीसह रेल्वे व बसस्थानकाच्या फलाटांवर सौर पॅनलच्या माध्यमातून सौरऊर्जा निर्मिती शक्य आहे. तसे केल्यास कोटय़वधींची वीज वाचेल. शहरात सौरऊर्जेचा वापर वाढल्यास पर्यावरणाचेही संवर्धन करणे शासकीय यंत्रणेला शक्य होईल.

चाळीस लाख लोकसंख्येच्या नागपूरला सव्वासहा लाख वीज ग्राहक असून भविष्यात ही संख्या आणखी वाढेल. शहराच्या विविध भागात महापालिका, राज्य शासन व केंद्र सरकारची अनेक कार्यालये असून अनेक उंच इमारतीही आहेत. पैकी नवीन इमारतीत आता सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी काही नियम शासनाने आखून दिले आहे. त्यामुळे शहरात काही प्रमाणात सौर पॅनल विविध प्रकारे ऊर्जा निर्मिती करताना दिसतात, परंतु जुन्या इमारतींमध्ये मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. स्मार्ट सिटी योजनांतर्गत शहरात वीजबचतीसह पर्यावरण संवर्धनाकरिता शहरातील प्रत्येक इमारतींवर योग्य नियोजन करून सौर पॅनल लावल्यास कोटय़वधींची वीजबचत शक्य आहे. निश्चितच त्याने वीज ग्राहकांना विजेच्या बिलाकरिता भराव्या लागणाऱ्या जास्त बिलांपासूनही मुक्ती मिळेल. वीज वापर कमी झाल्यास रोज वीज निर्मितीकरिता लागणारा कोळसाही मोठय़ा प्रमाणावर वाचून खनिज संपत्तीही वाचेल. त्यामुळे वीज निर्मितीच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या राख व धुराचेही प्रदूषण कमी होईल. नागपूरसह सर्वत्र सध्या सौर पॅनल उभारण्याकरिता मोठय़ा प्रमाणावर खर्च येतो. त्याकरिता केंद्र व राज्य शासनासह महापालिकेकडून काही प्रमाणात अनुदानही दिले जाते, परंतु अनुदान देण्यापेक्षा या सौर पॅनलसह सौरऊर्जा निर्मितीकरिता लागणाऱ्या सगळ्याच सुटय़ा भागांचे दर कमी केल्यास मोठय़ा प्रमाणावर नागरिकही स्वत सौर उर्जा निर्मितीकरिता प्रोत्साहित होतील.

सध्या बाजारात सौरऊर्जा निर्मित करणारे काही पॅनल उपलब्ध आहेत. ते घराच्या खिडकीवर लावूनही वीज निर्मिती शक्य आहे. तेव्हा स्मार्ट सिटी योजनांतर्गत त्याचाही विचार होण्याची गरज आहे. शहरात नागपूर, इतवारी, अजनी हे रेल्वेस्थानकासह भविष्यात त्यात वाढ होईल. सोबत शहरात मेट्रो रेल्वे प्रस्तावित असून त्याचेही अनेक रेल्वेस्थानक असतील. येथीलही फलाट व शेड हे सौर पॅनलचे उभारल्यास मोठय़ा प्रमाणावर वीज निर्मिती शक्य आहे. नागपूरला गणेशपेठ, मोरभवन, वर्धमाननगरसह इतरही काही ठिकाणी एसटीची बसस्थानके असून अन्य बरीच बसस्थानकेही आहेत. येथेही छत म्हणून सौर पॅनल उभारल्यास मोठय़ा प्रमानावर सौरऊर्जा निर्मिती शक्य आहे.

शहरात अनेक केंद्र व राज्य शासनाचे शासकीय कार्यालये असल्याने तेथेही सौरऊर्जा निर्मिती शक्य असून महापालिकेच्या १९० शाळांमध्येही हा प्रकल्प यशस्वीरित्या चालू शकतो, परंतु ही सौरऊर्जा निर्मिती करण्याकरिता प्रशासनाला प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज आहे. शहरात सध्या रोज ४५० मेगा व्हॅट वीज लागते. स्मार्ट सिटी योजनांतर्गत शहरात उंच इमारतींच्या संख्येत मोठी वाढ होणार असून शहराचा विस्तारही मोठय़ा प्रमाणात होणार आहे. तेव्हा निश्चितच विजेची मागणी वाढेल. सौरऊर्जा निर्मितीतून ही वाढीव ऊर्जा निर्मितीची गरज भरून निघणे शक्य आहे, परंतु त्याकरिता नागरिकांनाही सौर ऊर्जेकरिता पुढाकार घेण्याची गरज आहे.

शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा -महेश अग्रवाल

स्मार्ट सिटीत सौरऊर्जा अत्यावश्यक आहे, परंतु ‘मेडिकल’मध्ये काही वर्षांपूर्वी १ कोटी ८६ लाखांच्या निधीतून बरेच सौर पाण्याचे हिटक शंभरावर सौर पथदिवे मेडिकल परिसरात लावण्यात आले, परंतु काही महिन्यातच त्यातील पॅनल तुटण्यासह सगळ्याच पथदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या.

त्याने शासनाला कोटय़वधींचा फटका बसला. अद्याप या बॅटरी हरवल्या वा चोरीला गेल्याची तक्रार मेडिकलकडून पोलिसांकडे करण्यात आलेली नाही. तेव्हा शासनाने असे प्रकल्प यशस्वी व्हावे म्हणून शासकीय अधिकाऱ्यांचीही जवाबदारी निश्चित करण्याची गरज आहे, असे मत सुप्रसिद्ध विधीतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते महेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.

शहरात २५ केडब्लूपीचे पाच प्रकल्प

नागपूर महापालिकेच्या वतीने शहरात सध्या २५ केडब्लूपी (किलो व्हॅट पिक)चे लकडगंज, आशिनगर, नेहरूनगर येथे प्रत्येकी एक व महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील नवीन इमारतीवर दोन, असे एकूण ५ सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू आहेत. या पाचही इमारतीत दिवसा रोज सुमारे १०० च्या जवळपास युनीट वीज निर्मिती होते व वापरली जाते. सोबत महापालिकेने केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने शहरात १८१५ नागरिकांकडे सौर पाणी हिटर कार्यान्वित केले आहे. ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. त्याने मोठय़ा प्रमाणावर विजेची बचत होईल.

सौरऊर्जा संग्रहित करणाऱ्या बॅटरीचे दर कमी करा -रवींद्र रायकवार

सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज बॅटरीमध्ये संग्रहित करणे शक्य आहे.  त्याचा वापर रात्रीच्या वेळी वीज ग्राहक करू शकतो. या बॅटरीचे दर सध्या फार जास्त असल्याने त्यातून वापरलेल्या बॅटरी निकामी झाल्यावर प्रती युनिट काढलेला विजेचा दर फार जास्त राहत असल्याचे दिसते. त्यामुळे सौरऊर्जा वापराकडे नागरिकांचा कल नसतो. या बॅटरीचा दर कमी केल्यास सौरऊर्जेला वाव मिळणे शक्य होईल, असे मत रवींद्र रायकवार यांनी व्यक्त केले.

वीजबचत उपकरणांचा वापर वाढावा -प्रवीण सोनकुसरे

शहरात स्मार्ट सिटी योजनांतर्गत सगळ्याच घरात एलईडीचा वापर वाढवण्यासह कमी वीज वापरणाऱ्या उपकरणांनाच वापरण्याची सक्ती करण्याची गरज आहे. त्याने मोठय़ा प्रमाणावर वीजबचत होईल, असे मत प्रवीण सोनकुसरे यांनी व्यक्त केले.

सौरऊर्जा उपकरणे बसवण्याची सक्ती करा -राजेश लोणारे

नागपूरला स्मार्ट सिटी केल्यावर शहरात इमारतींसह कार्यालये व घरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल. त्यामुळे वीज वापरही वाढणार आहे. ही ऊर्जा सौरऊर्जेच्या माध्यमातून मिळवल्यास वीज निर्मितीवरील ताण कमी होऊन पर्यावरणाचे अप्रत्यक्ष संवर्धन होईल. त्याकरिता या योजनांतर्गत प्रत्येक इमारतीसह घरात सौरऊर्जा पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीची सक्ती करण्याची गरज आहे, असे मत राजेश लोणारे यांनी व्यक्त केले.