नागपूर : नागपूर ते पुणे दरम्यान नियमित गाड्यांना कायमच अधिक गर्दी असून या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रवाशांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. रेल्वेतर्फे वेगवेगळ्या मार्गावर या गाड्या सुरू देखील करण्यात येत आहेत.

नागपूर-बिलासपूर आणि नागपूर ते इंदूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. आता नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस करण्याचे नियोजन आहे. येत्या १५ सप्टेंबरला ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. ही चर्चा सुरू झाल्यानंतर नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. परंतु नागपूर ते पुणे हे अंतर बघता चेअर कार असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणे सोयीचे नसल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावर येत्या काळात स्लीपर क्लास असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु या मार्गावरील प्रवाशांची गर्दी बघता तूर्तास रेल्वेने सुपर फास्ट विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले

नागपूर-पुणे सुपर-फास्ट एसी स्पेशल २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूरहून सायंकाळी ७.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुणे-नागपूर सुपर-फास्ट एसी स्पेशल रविवारी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पुण्याहून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

एलटीटी-नागपूर- एलटीटी स्पेशल

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) -नागपूर सुपर-फास्ट स्पेशल ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी एलटीटीवरुन रात्री १२.२५ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूर-एलटीटी सुपर-फास्ट स्पेशल दर शुक्रवारी १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान नागपूरवरून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता एलटीटीला पोहोचेल.

नागपूर-समस्तीपूर-नागपूर स्पेशल

नागपूर-समस्तीपूर सुपर-फास्ट स्पेशल ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी सकाळी १०.४० वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता समस्तीपूरला पोहोचेल.

हेही वाचा – Video : गडचिरोलीत पुरामध्ये अडकलेल्या तरुणाने झाडाला पकडून काढले ३६ तास…

समस्तीपूर-नागपूर सुपर-फास्ट स्पेशल ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी समस्तीपूरहून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचेल.