बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहरालगतच्या हजारो ग्रामस्थांनी धडक देत बुलढाणा शहराच्या नियोजित हद्दवाढीविरोधात आज एल्गार पुकारला. कडक उन्हाची तमा न बाळगता सागवन, येळगाव सुंदरखेड, जांभरून, माळविहीर आदी गावांतीलह जारो महिला-पुरुष मोठ्या संख्येने व निर्धाराने सहभागी झाले होते. गावातील हजारो आबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे हा मोर्चा पूर्णपणे मूक होता. घोषणाबाजी किंवा नारेबाजी न करता ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
शहरातील वाहतुकीवर या मोर्चाचा मोठा परिणाम झाला. काही काळ वाहतूक ठप्प पडली. बुलढाणा शहर आणि पोलिस प्रशासनालाही परिस्थिती हाताळताना मोठी कसरत करावी लागली. बुलढाणा नगर परिषद यांनी शहराची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव घेतला असून लगतची गावे शहरात समाविष्ट करण्याचा निर्णय प्रक्रियेत आहे. याच निर्णयाच्या निषेधार्थ संबंधित गावांनी ‘गाव बचाव कृती समिती’ स्थापन करून आंदोलन उभारले आहे.
हद्दवाढ रद्ध करा
समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हद्दवाढीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, ही मुख्य मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात डी.एस. लहाने, सुनिल सोनुने, ऍड. दशरथसिंग राजपूत, सतिष भाकरे पाटील, रविंद्र भाकरे पाटील, प्रतिक जाधव, सुरेश कंकाळ, श्रीकांत जाधव, अनिता जाधव आदींचा समावेश होता.
निवेदनात हद्दवाढ प्रस्ताव अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगर परिषदेला स्वतःहून हद्दवाढीचा ठराव करून तो शासनाकडे पाठविण्याचा अधिकार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नगर परिषद हद्दीत सामील व्हायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला आहे, असेही नमूद करण्यात आले.
सर्व संबंधित ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे. तसेच तहसीलदारांनी नागरी व अकृषक क्षेत्राबाबत सखोल चौकशी न करता चुकीचे अहवाल दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व नगर परिषदेकडून नियमांचे उल्लंघन करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
यापूर्वी मागील २१ डिसेंबर २०२० रोजी नगर परिषदेत माळविहीर, जांभरून, येळगांव, सागवन, सुंदरखेड या गावांचा शहरात समावेश करण्याचा ठराव मंजूर झाला होता. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रस्ताव शासन दरबारीं थंड बस्त्यात पडला होता. मात्र मागील दोन महिन्यांत पुन्हा हद्दवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आमदार संजय गायकवाड हद्दवाढीचे जोरदार समर्थन करत असून विकासासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र ग्रामस्थांनी विरोधाची आणि आज मंगळवारी आंदोलनाची भूमिका घेतली. हा प्रश्न आता जिल्हा प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आवश्यक असल्यास हा मुद्दा मुख्यमंत्री स्तरावर नेण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
एकीकडे विकासाच्या दृष्टीने हद्दवाढीची गरज असल्याचा दावा होत असताना, दुसरीकडे गावांच्या स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सामोपचाराने तोडगा काढावा लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जिल्हाधिकारी यांना गाव बचाव कृती समितीच्या वतीने डी एस लहाने, सतिश भाकरे पाटील, सुनील सोनुने, रवींद्र भाकरे, ॲड. दशरथसिंह राजपूत नाना राजगुरे, गजानन इंगळे, अनिल कापसे, प्रकाश राजगुरे, श्रीकांत जाधव राजेंद्र पवार, मंगलसिंग राजपूत, सारंग सुरुशे, संजय चव्हाण, सुभाष मिसाळ, रामेश्वर माळी, शीला आराख, महेश देवरे, रमण राजपूत, मो.अलीम,ॲड. मुकरम बागवान, मिलिंद जाधव, शत्रुघ्न गडाख यांच्या स्वाक्षरीने असलेले निवेदन मोर्चातील सागवन, सुंदरखेड, माळविहिर, येळगाव येथून आलेल्या प्रत्येक गावच्या महिला प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने सादर केले.
