scorecardresearch

…तर हजारो विद्यार्थी पोलीस भरतीला मुकणार

पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवारांना नाहक त्रास होत आहे.

…तर हजारो विद्यार्थी पोलीस भरतीला मुकणार
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नागपूर: पोलीस भरती प्रक्रियेमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. सध्या पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अखेरचा एक दिवस शिल्लक आहे. मात्र संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवारांना नाहक त्रास होत आहे. अर्जासोबत लागणारे शुल्क ऑनलाईन भरल्यानंतरही अर्जासोबत ती जमा झालेले दिसत नाही. दुसरीकडे खात्यातून मात्र हे पैसे वजा होत आहेत.  या सर्व गोंधळात अर्ज मात्र अपूर्ण राहत असल्याने चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची संकेतस्थळ सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पोलिस भरती अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> ‘भारत जोडो’ महाराष्ट्रात यशस्वी, पण ‘नेते जोडो’त काँग्रेस अपयशी; माजी मंत्री लवकरच भाजपमध्ये जाणार

सर्व्हर डाउन होणे, वेबसाइट हॅँग होत असल्याने रात्रभर जागून उमेदवार आपले अर्ज भरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आता शुल्क भरले तरी ते जमा होत नसल्याने अर्ज अपूर्ण असतो. यामुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी भरतीपासून वंचित राहू शकतात.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 10:40 IST

संबंधित बातम्या