अनैतिक संबंधातून विधवा महिलेला झालेल्या बाळाची विक्री करणारी मुख्य आरोपी श्वेता सावळे ऊर्फ आयेशा खान हिच्यासह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाने अटक केली. आरोपींना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यापूर्वी तोतया परिचारिका रेखा पुजारी हिला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
हेही वाचा >>>शरद पवारांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त!, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीतील ३० वर्षीय विधवा महिलेचे भाचा असलेल्या युवकासोबतच अनैतिक संबंध होते. पतीच्या निधनानंतर भाच्याने तिला मदत केली. त्यानंतर दोघांत प्रेमंसंबंध निर्माण झाले. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही सोबत राहत होते. ती विधवा गर्भवती झाली. त्यामुळे समाजात बदनामीच्या भयाने ती एका डॉक्टरकडे गेली. विधवेने गर्भपात करण्याची विनंती त्या डॉक्टरला केली. मात्र, त्याने लगेच बाळ विक्री करणाऱ्या टोळीची म्होरक्या श्वेता ऊर्फ आयेशा खान, तोतया परिचारिका रेखा पुजारी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी नियोजन करून विधवेचा गर्भपात करण्याऐवजी तिला बाळाची वाढ होण्यासाठी औषधी दिली. त्यानंतर गर्भपात केल्यास जीव जाण्याची भीती दाखवून बाळाला जन्म देण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच ते बाळ दत्तक घेण्याची तयारी दर्शविली.
नाईलाजाने त्या विधवेने बाळाला जन्म दिला. प्रसुतीच्या दुसऱ्याच दिवशी आयेशा खान, मकबुल खान आणि सचिन पाटील यांनी त्या बाळाची ५ लाख रुपयांत परराज्यातील एका दाम्पत्याला विक्री केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात आयशा खान आणि तिचा पती मकबुल खान, सचिन पाटील हे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होते. तिघांनाही कोराडीतील बाळ विक्री प्रकरणात एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उपस्थित केेले. न्यायालयाने तिनही आरोपींना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांच्या पथकाने केली.
हेही वाचा >>>बुलढाणा: बारावी पेपरफुटीप्रकरणी सहा जण ताब्यात; मुख्य सूत्रधाराचा कसोशीने शोध
विक्री केलेल्या बाळाचा शोध सुरू
विधवेला अनैतिक संबंधातून झालेले बाळ आयशा ऊर्फ श्वेता हिने टोळीच्या मदतीने परराज्यात विक्री केल्याची शक्यता आहे. आतापर्यंत आयशाने जवळपास २० ते २५ बाळांची विक्री केल्याची माहिती आहे. आयशावर आतापर्यंत डझनापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. विधवेच्या विक्री केलेल्या बाळाचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक एका शहरात रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.