नागपूर: वैष्णव देवीला जाणाऱ्या यात्रेकरूच्या बसवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी  दहशतवाद्यांचा पुतळा जाळताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवल्याने  आगीचा भडका उडून तिघे भाजले. जखमी कार्यकर्त्यांतवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिल्लीत ८ जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये  वैष्णवदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूच्या वाहनावर  दहशतवाद्यानी हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ विहिपने देशभर आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सायंकाळी नागपुरात संघ मुख्यालयाच्या शेजारी बडकस चौकात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे क्षेत्रीय मंत्री गोविंद शेडें यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशतवाद्याचा आणि पाकिस्तानचा निषेध करताना बजरंगदलाच्या काही   कार्यकर्त्यानी दहशतवाद्याचा पुतळा जाळला. पुतळा पेटवताना बजरंग दलाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकल्यामुळे एकच भडका उडाला आणि त्यात  तीन कार्यकर्ते जखमी झाले. यापैकी एका जास्तच होरपळला.   त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. उर्वरित दोन कार्यकर्त्यांचे  हात आणि केस जळले. एकाच्या पायाला मार लागला.  यावेळी एकच गोंधळ उडाला. त्यामुळे काही वेळ आंदोलन थांबविण्यात आले आणि तिघांना त्ताकाळ  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्याचे आंदोलन सुरू असताना पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणा सुरू होत्या. पुतळा जाळताना पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र कार्यकर्त्यानी पोलिसांना जुमानले नाही. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी धंतोली परिसरात दहशतवाद्याच्या विरोधात आंदोलन केले होते त्यावेळी  दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले होते. आजही उत्साहाच्या भरात आणि जोशात कार्यकर्ते आंदोलन करताना एका कार्यकर्त्याने पुतळावर पेट्रोल टाकल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला आणि त्यात तीन कार्यकर्ते जखमी झाले.  

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा, प्रदेश सचिव निलंबित

दरम्यान दहशतवाद्याच्या विरोधात आंदोलनाच्यावेळी गोविंद शेंडे यांनी दहशतवाद्यानी केलेल्या आंदोलना निषेध केला. केंद्र सरकारने ३७० रद्द केल्यानंतर जम्मुकाश्मीरमध्ये शांतता असताना त्या ठिकाणी अशांतता निर्माण करण्यासाठी केलेला हा दहशतवाद्याचा हल्ला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मु काश्मीरमध्ये मेहबुबा मुक्ती आणि उमर अबदुल्ला यांच्या पराभवामुळे तेथे अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यानी केलेला हा हल्ला आहे. या घटनेचा निषेध करत असून या पुढे बजरंग दलाचे कार्यकर्ते दहशतवादी कारवायांना तोडीस तोड उत्तर देतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यापुढे अमरनाथ यात्रा सुरू असताना या यात्रेच्या दरम्यान केंद्र सरकारने आता यात्रेकरुन सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी शेंडे यांनी केली. यावेळी विदर्भ प्रांत मंत्री ममत चिंचवडकर, शुभर अरखेल, अभिषेक गुप्ता, रितु सावडिया, निरंजन रिसालदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.