मेळघाटातील जांबू गावात आदिवासी महिला शेतात काम करत असताना अचानक तीन अस्वलांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, त्यात दोन महीला गंभीर जखमी झाल्या. जखमीं महिलांना तातडीने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
हेही वाचा >>>गोंदिया : ‘देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ’ ; राष्ट्रपतींना २१ मागण्यांचे निवेदन सादर
धारणी वनपरिक्षेत्रातील जांबू ते बोधरा गावादरम्यान गायत्री सालिकराम धांडे, सायली मनोज जांबेकर या मंगळवारी दुपारी आपल्या शेतात गव्हाचे पीक काढत असताना अचानक तीन अस्वलांनी हल्ला केला. त्यानी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकून शेजारील शेतातील लोक धावत आले. त्यांनी त्या महिलांची अस्वलाच्या तावडीतून सुटका केली, त्यानंतर त्यांना धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा >>>नागपूर : आ. सुर्वे यांचा मुलगाच आरोपी; काय म्हणाले वरुण सरदेसाई ?
सध्या त्यांच्यावर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच धारणी वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर व त्यांच्या पथकाने मदतकार्य केले. मात्र या हल्ल्यामुळे जांबू व जंगलालगतच्या सुमारे १२ गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची वनविभागाने दखल घेऊन जखमी महिलांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.